कोल्हापुरातील मटण वादावर अखेर तोडगा, ‘जाणून घ्या’ काय आहे नेमका प्रकार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – ४५० रुपये किलोच्या घरात असणारा मटणाचा दर ६०० रुपये झाल्याने जिल्ह्यातील नागरिक भडकले होते आणि थेट आंदोलनच पुकारलं होतं त्यानंतर शिवाजी पेठेत मंडळ आणि मटण विक्रेते यांच्यात पार पडलेल्या बैठकीत मटण वादावर तोडगा काढण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून अहवाल सादर करावा असे आदेश दिले होते. परंतु या आधीच्या बैठकीतच तोडगा निघाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.

काय आहे नेमके प्रकरण
पलीकडच्या गावात ज्या दराने मटण विक्री सुरु आहे त्याच दराने कसबा बावडा या ठिकाणी देखील करा अशी मागणी नागरीकांनी केली होती नाहीतर पर्यायी मटण विक्रेत्यांना गावात आणू असा इशारा नागरिकांनी दिला होता. त्यानंतर हे वारे कोल्हापूरच्या अनेक गावांत पसरले आणि लोकांनी गावात मटण विक्री थांबवल्याचे पहायला मिळाले.

त्यानंतर काही मंडळांनी ४५० रुपये किलोप्रमाणे मटण विक्री सुरु करून महाग दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना धडा शिकवला. त्या पाठोपाठ तालमीतील अनेक मुलांनी यामध्ये सहभाग नोंदवला. अखेर जिल्ह्याधिकारी दौलत देसाई यांना मटण विक्रेत्यांनी पाचारण केले. देसाई यांनी याबाबतच्या अहवालाचे आदेश दिले आहेत.

संयुक्त समितीद्वारे होणार काम
या सर्व प्रकरणासाठी बारा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती, समितीत नागरी कृती समिती आणि मटण विक्रेते संघटनेचे प्रत्येकी पाच सदस्य होते. महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, अन्न, औषध प्रश्न अधिकारी समिती नेमली होती. २८० रुपये किलो दराने मिश्र मटण (चरबीसह) व विनामिश्र मटन ४५० रुपये किलोने विक्री व्हावी, अशी मागणी कृती समितीने केली होती. तर, मटण विक्रेत्यांनी प्रतिकिलो ५६० रुपयांऐवजी ५४० रुपयाने विक्री करू, अशी तयारी दर्शवली होती.

बकऱ्यांच्या किमतीत दरवाढ झाल्याने मटण महागले
दुष्काळ आणि त्यानंतरचा महापूर, परतीचा पाऊस यामुळे बकऱ्यांची पैदास घटल्याने बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत बकऱ्यांचा पुरवठा कमी पडू लागल्याने बकऱ्यांच्या दरात वाढ झाल्याने मटणाचे दरही वाढल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले होते. चामड्याचे कारखाने बंद झाल्यामुळे पूर्वी चामडे विकून विक्रेत्यांना मिळणारे पैसे देखील आता मिळत नाहीत. पूर्वी चामड्य़ाला ३०० रुपये मिळायचे. आता दहा/वीस रुपये सुद्धा मिळणे कठीण झाल्याचे विक्रेते सांगतात.

Visit : Policenama.com