पुणे पदवीधर निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीमधील पाटलांची प्रतिष्ठा लागली पणाला

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनालईन – पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात भाजप अशी जोरदार लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. हे दोन्ही पक्ष उमेदवारी कोल्हापूर, सांगलीला देणार की, पुण्यााला हे पंधरा दिवसात निश्चित होणार आहे. काटाजोड लढतीची अपेक्षा असल्यानं उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावत पक्षीय नेत्यांशी संपर्क वाढवला आहे. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

विधानपरिषदेच्या पुणे विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळं राजकीय हालचालींना वेग आला आहे. 2 वर्षे अनेकजण या निवडणुकीची तयारी करत आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी अशीच लढत होण्याची शक्यता असल्यानं या दोन पक्षांची उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील यांना भाजपची हॅट्रीक करायची आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अरुण लाड यांच्या रुपानं सांगली जिल्ह्यात आणखी एक आमदार वाढवायचा आहे. यामुळं या दोघांची प्रतिष्ठाच पणाला लागणार आहे.

प्रकाश जावडेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघावर 5 वेळा भाजपचा झेंडा लावला. त्यामुळं इथं भाजपचा वरचष्मा आहे. म्हणून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. चंद्रकांत पाटील कोथरूडमधून विधानसभेवर निवडून गेल्यानं त्यांच्या वारसदाराला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांची राहणार आहे. सध्या राजेश पांडे यांचे नाव आघाडीवर आहे. 20 वर्षे या मतदारसंघाची तयारी करणारे कोल्हापूरचे माणिक पाटील चुयेकर यांचे त्यांना आव्हान असणार आहे. सोलापूरचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावली आहे. सातारा येथील शेखर चरेगावकर यांचंही नाव अलीकडे चर्चेत आलं आहे. 6 पैकी आता कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते याचीच आता उत्सुकता आहे. ज्याला उमेदवारी मिळणार नाही तो बंडखोरी करण्याची शक्यता फार कमी आहे.

महाविकास आघाडीच्या वतीनं ही निवडणूक लढवताना जागा मात्र राष्ट्रवादीला मिळणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादीलाच जागा जाणार हे गृहीत धरून काँग्रेसच्या एकाही नेत्यानं तयारी केली नाही. उमेदवारीसाठी लाड यांचं नाव आघाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत 37 हजारांवर मतं मिळवली होती. गेल्यावेळचे पक्षाचे उमेदवार सारंग पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानं लाड यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तरीही त्यांना उमेदवारीसाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवरच त्यांची उमेदवारी अवलंबून राहणार आहे.

राष्ट्रवादीकडून पक्षाचे राज्य सरचिटणीस उमेश पाटील इच्छुक आहेत. ते राज्य पदवीधर संघटनेचे अध्यक्ष आहेत. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी देखील बरीच तयारी केली आहे. नंदादीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या नीता ढमाले या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली आहे. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे हेदेखील घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक प्रताप माने यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

या 2 पक्षांव्यतिरीक्त संभाजी ब्रिगेडचे मनोज गायकवाड, प्रविण कोडोलीकर यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या 2 उमेदवारांना टक्कर देणारे इतर काही उमेवादर रिंगणात असण्याची शक्यता आहे.

पदवीधर मतदारसंघ इच्छुक

भाजप – राजेश पांडे, शेखर चेरगावकर, माणिक पाटील चुयेकर, रोहन देशमुख, सचिन पटवर्धन, प्रसन्नजित फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेस – अरुण लाड, नीता ढमाले, उमेश पाटील, बाळराजे पाटील, श्रीमंत कोकाटे, प्रताप माने

इतर – प्रवीण कोडोलीकर, मनोज गायकवाड, भरत रसाळे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like