मनगुत्ती गावात 8 दिवसात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, बैठकीत निघाला तोडगा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा यासाठी मराठी भाषिक महिलांनी आज आंदोलन केले. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी, तहसीलदार व गावातील पंच यांच्यात बैठक झाली. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आठ दिवसात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून पुन्हा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. महाराष्ट्रात देखील या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. तर मनगुत्ती गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी, पंच मंडळी यांची बैठक पार पडली. यामध्ये आठ दिवसांत एकमेकांच्या सहमतीने तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा पुतळा 5 ऑगस्ट रोजी बसवण्यात आला होता. गावातील एका गटाचा याला विरोध होता. ग्रामपंचायतीने परवानगी दिली होती. पण पुतळा हलविण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. गावातील महिला, तरुण मोठ्या संख्येने गावातील मुख्य चौकात जमले होते. गावातील मुख्य रस्ता पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रोखला होता. तेथे काही महिलांवर पोलिसांनी लाठीहल्ला केला. पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत काढून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

परवानगी न घेता हा पुतळा बसवण्यात आला असल्याने तो हटवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला होता. दुसरीकडे हा पुतळा एखाद्या सभागृहासमोर बसवावा असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, याला गावकऱ्यांनी विरोध केला. पोलिसांच्या विरोधात गावकरी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांना माघार घ्यावी लागली होती. परंतु कर्नाटक सरकारने आदेश दिल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात शुक्रवारी हा पुतळा हटवण्यात आला होता.