महाराष्ट्रातील ‘या’ जिल्हयात लॉकडाऊननंतर उघडलं ‘सलून’, मालकानं सोन्याच्या कात्रीनं कापले ग्राहकाचे केस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   लॉकडाऊनमुळे जवळपास 3 महिन्यानंतर महाराष्ट्रातील सलून आणि ब्युटी पार्लर पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. शासनाची परवानगी मिळाल्यानंतर कोल्हापुरातील सलून मालकाने त्याच्या पहिल्या ग्राहकाचे केस कापण्यासाठी सोन्याच्या कात्रीचा वापर केला.

‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणूवरील लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथिल केले असून त्यानंतर 28 जूनपासून नाव्ह्याची दुकाने आणि सलून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारकडून परवानगी मिळाल्याच्या आनंदात कोल्हापुरातील सलूनचे मालक रामभाऊ संकपाल यांनी सोनीच्या कात्रीचा वापर त्याच्या पहिल्या ग्राहकांचे केस कापण्यासाठी केला. ते म्हणाले, लॉकडाऊनमुळे सलून तीन महिन्यांहून अधिक काळ बंद राहिल्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. यावेळी सलून मालक आणि कर्मचार्‍यांना वाईट परिस्थितीतून जावे लागले आहे पण आता पुन्हा एकदा सलून उघडण्यात त्यांना फार आनंद झाला आहे.

संकपाल यांनी सांगितले की, बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक सलून मालकांनी आपले प्राण गमावले. आम्ही या वाईट परिस्थितीला तोंड देण्यास यशस्वी झालो, म्हणून आनंदाने सोन्याच्या कात्रीने आमच्या पहिल्या ग्राहकाचे केस कापले. सोन्याच्या कात्रीबाबत ते म्हणाले की, ते बर्‍याच वर्षांपासून याच व्यवसायात आहे आणि आपल्या बचतीत त्यांनी 10 तोळे सोन्याची कात्री खरेदी केली आहे.