भिडे गुरुजी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट ;चर्चेचा विषय गुलदस्त्यात 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवप्रतिष्ठानचे  संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सकाळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. अवघ्या १० ते १५ मिनिटांची ही भेट होती. या भेटीदरम्यान नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. मात्र या भेटीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान , चंद्रकांत पाटील कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संभाजी भिडे काल दुपारी तिथे आले होते. मात्र पाटील यांना येण्यास उशिर झाल्याने संभाजी भिडे सांगलीला परतले. परंतु आज सकाळी सव्वादहा वाजता संभाजी भिडे सांगलीहून कोल्हापूरला आले आणि चंद्रकांत पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली. या भेटीचा नेमका तपशील कळू शकलेला नसला तरी ही खासगी भेट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोण आहेत संभाजी भिडे ? 
मनोहर भिडे हे त्यांचं मूळ नाव, पण संभाजी भिडे गुरूजी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. वय वर्षं 80 आहे.  साता-यातलं सबनीसवाडी हे त्यांचं मूळ गाव. न्यूक्लिअर फिजिक्समध्ये एम.ए. केल्यानंतर ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते. पूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. मात्र मतभेद झाल्यानंतर त्यांनी 1984 मध्ये श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान नावाची संघटना उभी केली. या संघटनेत विविध जातीधर्माच्या तरूणांचा समावेश असून, त्यातल्या प्रत्येकाला धारकरी म्हणतात. गडकोट मोहीम आणि दुर्गामाता दौड असे दोन प्रमुख कार्यक्रम ही संघटना राबवते.
भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी भिडे गुरुजींवर प्रकाश आंबेडकरांचा आरोप 
कोरेगाव भिमामध्ये उसळलेली दंगल भिडे गुरुजींच्या चिथावणीमुळं भडकली, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे.  तर यामागं राजकीय षडयंत्र असून, त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी भिडे गुरूजींनी केलेली आहे. यानिमित्तानं भिडे गुरूजी प्रकाशझोतात आले आहेत.