शरद पवारांनी पूरग्रस्तांना ‘मदत’ देण्यासाठी आवाहन केल्यानंतर अवघ्या 30 मिनिटात 1 कोटी ‘जमा’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्यातून आणि संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मदतीसाठी आवाहन केलं आणि अवघ्या अर्ध्यातासात तब्बल एक कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे.

शुक्रवारी बारामती शहरातील व्यापाऱ्यांची एक तातडीची बैठक पवार यांनी रयत भवनमध्ये घेतली होती. यावेळी पूरग्रस्तांच्या मदतनीधीसाठी त्यांनी व्यापाऱ्यांना आवाहन केल्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माणुसकीचे उत्कट दर्शन घडवत फक्त अर्ध्या तसातच १ कोटी रुपयांची रक्कम मदतनिधी म्हणून जमा केली.

बारामतीतून मदतीचा मोठा ओघ
याचबरोबर बारामतीमधील अनेक व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांच्या मदतीबरोबरच कपडे,धान्य आणि भांड्यांची मदत देखील देण्यात आली. त्याचबरोबर सहकारी साखर कारखान्यांनीदेखील मदतीसाठी पुढाकार घेत पूरग्रस्त भागातील लोकांसाठी ४०० पोती साखर देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय येथील विद्या प्रतिष्ठानकडून सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी २५ लाखांची मदत देण्यात आली.

शरद पवार करणार पूरग्रस्त भागाची पाहणी
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासमवेत शरद पवार उद्या सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. शनिवारच्या या दौर्‍यावेळी ते पूरग्रस्त भागांना भेटी देऊन तेथील स्थानिक नागरिकांना भेटून समस्या जाणून घेतील. सकाळी ०९ वाजता ते तांबावणे (ता.फलटण) येथून या दौऱ्याची सुरुवात होणार असून त्यानंतर दुपारी ०३ वाजता पलुस (ता.सांगली) येथे जाणार आहेत. या वेगवान पूरपाहणीच्या दौर्यात ते नागरिकांना दिलासा देत प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपत्ती निवारणासंबंधी मार्गदर्शन देखील करतील असा अंदाज आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like