पूरसंकट : पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत २८ जणांचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – पंचगंगा, कोयना, कृष्णेसह पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेल्या पूरामुळे कोल्हापूर, सांगली, कराड सह पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती शुक्रवारी चौथ्या दिवशीही कायम आहे. पुणे बंगलुरु महामार्ग आजही बंद असून सांगली शहरात सकाळपासून संततधार सुरु आहे. अलमट्टी धरणातून ३ लाख ८२ हजार क्युसेकने विसर्ग सुरु असला तरी सांगलीतील कृष्णेच्या पाणी पातळी ५७.८ फुटापर्यंत वाढली आहे.

पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मध्यरात्री सांगलीत दाखल झाले आहे. सांगली पुरात बुडाली असताना पुण्यात पक्षाच्या कार्यक्रमात मग्न असल्याची टिका झाल्यानंतर सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख हेही आता शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत सांगलीत पोहचणार आहे.
कृष्णेच्या पाणीपातळीत घट होत नसतानाच सांगली शहरात सकाळपासून संततधार पाऊस सुरु झाल्याने सांगलीकर पुन्हा धास्तावले आहेत.

शहरात पिण्याचे पाणी, दुध, भाजीपाला अशा सर्वच जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. राधानगरीतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत २ फुटाने घटली आहे. तरीही शहरातील पाणी फारसे कमी झालेले नाही. त्यात हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिल्याने लोक धास्तावून गेले आहेत. कोल्हापूरातील चिखली भागात अजूनही अनेक नागरिक आपल्या घरात अडकले आहेत. जवानांकडून त्यांना बाहेर काढण्याबरोबरच जेवणांचे वाटप केले जात आहे.

शहरातील या महापूरामुळे शेकडो जनावरे मरुन पडली असून पूर ओसरताच त्यांची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. शहरातील सर्व भटकी कुत्री, मांजरे, काही जनावरे या महापूरात बुडून मृत्यु पावले आहेत. ती पाण्याबरोबर वाहून जाताना दिसत आहेत. काही जनावरे अनेक ठिकाणी अडकून पडलेली दिसत आहेत.

कोल्हापूर शहरातील पाणी कधी ओसरेल हे कोणीही सांगू शकत नसल्याने सुरक्षितस्थळी आलेल्या लोकांनाही आपल्या घराची चिंता आता सतावू लागली आहे.