कोल्हापुरातील जवानाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूरातील एका जवानाचा आसाम येथे सेवा बजावत असताना पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. सुरज साताप्पा मस्कर असे या जवानाचे नाव असून गिरगाव येथिल हा जवान होता. सैन्य प्रशासनाकडून आज सकाळी त्याच्या कुटुंबीयांना ही माहिती कळविण्यात आली. अवघ्या तेवीस वर्षाच्या जवानांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळ पसरली आहे. सोमवारी सुरजचे पार्थिव गावात येण्याची शक्यता आहे.

गिरगाव या गावाला सैनिकी परंपरा आहे. सैन्यात सेवा बजावत असताना मृत्यू झाल्याची ही गावातील पहिलीच घटना आहे. दरम्यान, मस्कर कुटुंबाची तिसरी पिढी सैन्य सेवेत आहे. सुरजचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. यानंतर आंबोली येथे १२वी पर्यतचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अवघ्या १८ व्या वर्षी तो सैन्यात भरती झाला होता. दोन वर्षापूर्वी त्याचा गावातीलच रेवती जाधव यांच्याशी विवाह झाला होता. सध्या तो ११० बॉम्बे इंजिनियरिंग बटालियनमध्ये कार्यरत होता. आसाममधील डिंजाल येथे सेवा बजावत होता. एक महिन्याच्या सुट्टीनंतर तो १० मार्चला पुन्हा रुजू झाला होता.

आज पहाटे तो सहकाऱ्यांसह सेवा बजावत असतांना त्याला हृदय विकाराचा झटका येऊन तो कोसळला. सहकार्यांनी त्याला दवाखान्यात दाखल केले मात्र, तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. सकाळी सातच्या सुमारास त्याच्या कुटुंबियांना याची माहिती मिळताच मस्कर कुटुंबासह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. सोमवारी त्याचे पार्थिव गावात येण्याची शक्यता आहे.