#AirStrike ऑपरेशनमध्ये कोल्हापूरच्या ‘त्या’ मराठमोळ्या जवानाने केले एका विमानाचे नेतृत्व

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणारे जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उध्वस्त करत जैशचे अनेक मोठे कमांडर तसेच मसद अजहर याचे दोन भाऊ आणि मेहुणा यांचा खात्मा केला आहे. हल्ल्याच्या तयारीत असणाऱ्या आणि दहशतवादाची ट्रेनिंग घेणाऱ्या तब्बल ३५० दहशतवाद्यांचाही वायु दलाने खात्मा केला आहे. आनंदाची आणि गर्वाची बाब अशी की, या ऑपरेशनमध्ये एक मराठमोळा जवान सहभागी होता.

अमित कुलकर्णी असं या जवानाचं नाव आहे. अमित कुलकर्णी हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड गावचे सुपुत्र आहेत. ज्या १२ विमानाने दहशतवादी तळं उध्वस्त केली त्यातील एका विमानाचे नेतृत्त्व अमित यांनी केले होते. समोर आलेल्या माहितीनुसार, हवाईदलाच्या ताफ्यात अमित हे सोमवारी रात्री उशिरा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून कारवाईत सामील झाले होते. त्यामुळे या ऑपरेशनमध्ये एक मराठमोळा जवान सहभागी झाला.

अमित यांची पत्नी अनघा यांनी गावाकडे असणाऱ्या अमित यांच्या वडीलांना ही माहिती दिली. आपल्या गावचा सुपुत्र इतक्या मोठ्या ऑपरेशनमध्ये सहभागी होता हे समजताच कुरूंदवाडमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. अमित यांचा विवाह झाला असून त्यांना एक मुलगा आहे. ते पत्नी-मुलासह जम्मू-काश्मीर येथे वास्तव्यास आहेत. हवाई हल्ल्यानंतर कुलकर्णी यांच्या घरी अनेकांनी अभिनंदन केले. त्यांच्या शौर्याचे सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे.

अमित यांचे पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक ३ मध्ये झाले. त्यानंतर सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सातारा सैनिक शाळेत झाले. खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीत उर्वरित शिक्षण पूर्ण करून २००१ साली अमित कुलकर्णी हवाईदलात दाखल झाले.