अवैध व्यवसायिकांशी लागेबांधे असणार्‍या 3 पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अवैध व्यवसायिकांशी लागेबांधे ठेवणार्‍या 3 पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. ही निलंबन कारवाई कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, जिल्हयातील 31 पोलिस ठाण्यातील 50 हून कर्मचारी पोलिस अधीक्षकांच्या रडारवर आहेत.

महादेव रेपे, नारायण गावडे आणि अमित सुळगावकर यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. निलंबीत कर्मचारी हे गांधीनगर आणि जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पोलिस अधीक्षकांनी 3 पोलिस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर संपुर्ण कोल्हापूर जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस कर्मचारी रेपे, गावडे आणि सुळगावकर यांचे जिल्हयातील काही अवैध व्यवसायिकांशी संबंध असल्याची माहिती समोर आली होती. प्राप्‍त माहितीची शहानिशा करून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिस दलातील सुत्रांनी सांगितले आहे. आगामी काळात देखील अवैध व्यवसायिकांशी लागेबांधे ठेवणार्‍या पोलिसांवर अशीच कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.