Kolhapur News : राज्यात अव्वल ठरली कणेरीवाडीची Digital शाळा, विद्यार्थ्यांना स्मार्ट TV वर शिक्षणाचे धडे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जिल्हा परिषदची शाळा म्हटले की नाक मुरडले जाते. तिथे अपु-या सुविधा असतात असा अनेकांचा समज असतो. अशा शाळेकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. मात्र, जिथे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या दिवशीही शाळेत यावेसे वाटते, अशी जि. प. शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीवाडी या छोट्याश्या गावात आजी- माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने डिजिटल करण्यात आली आहे. तब्बल 29 लाख रुपये खर्च करून येथील शाळा खासगी शाळांच्या तोडीस बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण राज्यात डिजिटल ठरलेली ही पहिलीच शाळा असणार आहे. लवकरच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या नव्या शाळेचे उद्घाटन केले जाणार आहे.

आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा विकास व्हावा यासाठी निधी जमा केला. तब्बल 29 लाखा रुपये खर्चून ही शाळा डिजिटल करण्यात आली आहे. शाळेसाठी केवळ 6 लाखांची सरकारी मदत मिळाल्याचे येथील शिक्षकांनी सांगितले आहे. लवकरच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या नव्या शाळेचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यादृष्टीने शाळेने जय्यत तयारी सुरु आहे. शाळेच्या मैदानावर मंडप टाकला असून सुंदर सजावट केली आहे. शाळेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे सर्वाधिक पटसंख्या अशी ओळख आहे.

या शाळेत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी कम्युटर लॅब आहे. जेथे विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधांचा समावेश आहे. तर दुसरीकडे वर्गात टीव्ही देखील आला आहे. तंत्रज्ञानाने युक्ती अशी शाळा पाहून विद्यार्थी आवर्जून शाळेत येत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना राज्याच्या संस्कृतीची चांगल्या प्रकारे ओळख व्हावी यासाठी शाळाभर पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा प्रयत्न आहे. शाळेत विद्यार्थ्यीही आनंदाने शिक्षण घेताना दिसून येत आहेत.