नवरात्रीनिमित्‍त कोल्हापूर पोलिसांनी हॉटेल संदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – नवरात्रीदरम्यान कोल्हापूरात येणाऱ्या भाविकांचे हाल आणि गैरसोय होऊ नये यासाठी कोल्हापूर शहरातील हॉटेल्स रात्री 11 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. उत्साहाच्या काळात आचारसंहिता लागू झाली तरी हॉटेल व्यवसायिकांना रात्री हॉटेल सुरु ठेवण्यासाठी अर्धातास जास्त मुभा मिळणार असल्याचे पोलिस आयुक्त डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सांगितले.

काही दिवसांवर नवरात्र उत्सव आला आहे, या दरम्यान शहरात अंबाबाईच्या दर्शनासाठी राज्यातील भविक येत असतात. परंतू यंदा विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्याने कधीही आचारसंहितेची घोषणा होऊ शकते. त्याचा परिणाम म्हणून हॉटेल देखील रात्री 10.30 च्या दरम्यान बंद होतील. यामुळे भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

लोकसभेदरम्यान आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यातील हॉटेलसह रस्त्यावरील हातगाड्या रात्री 10.30 पर्यंत बंद करण्यात येत होत्या. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. परंतू आता नवरात्र असल्याने भाविकांचे हाल होऊ नयेत म्हणून आचारसंहिता लागू झाली तरी हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहतील. हॉटेल व्यवसायिकांनी देखील या काळात हॉटेलच्या वेळेत वाढ करुन मागितली होती. आता मिळालेल्या मुभेमुळे हॉटेल व्यवसायिक देखील समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे.

Visit – policenama.com