कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचे ‘थैमान’, तब्बल सहा हजार कुटुंबांचे ‘स्थलांतर’ !

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या १२ दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे . नद्या, नाले आणि तलाव दुथडी भरून वाहू लागल्याने या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले असून घराघरात पाणी शिरल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे सांगली आणि कोल्हापूरचा अनेक गावांशी संपर्कही तुटला आहे. गेल्या दोन दिवसात आपत्ती निवारण पथक आणि एनडीआरएफच्या टीमने कोल्हापुरातून दोन हजार तर सांगलीतून चार हजार अशा एकूण सहा हजार कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले आहे.

सांगलीतही भयावह स्थिती
सांगलीतही पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने अनेक गावांना त्याचा फटका बसला आहे. कोयनेतून १ लाख ३४ हजार पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने कोयना परिसराती गावं आणि शेती पाण्याखाली गेली आहे. येथील मुख्य एसटी स्टँड चौकातही पुराचे पाणी साचल्याने सांगलीचा इतर जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, पुरात अडकलेल्या ४ हजार कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. माजी खासदार राजू शेट्टी देखील अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

मुंबईहून हेलिकॉप्टर रवाना
कोल्हापूर आणि सांगलीतील पूरातून ग्रामस्थांची सुटका करण्यासाठी मुंबईतील तटरक्षक दलाचे एक हेलिकॉप्टर सांगली आणि कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. तर एनडीआरएफच्या टीमने रबरी बोटीच्या सहाय्याने पुरात अडकलेल्यांची सुटका करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. विशेष करून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर्वपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like