कोल्हापूर : महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तरुणाईचा पुढाकार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात महापुराने थैमान घातले आहे. ज्या ठिकाणी पाणी येण्याची सूतराम शक्यता नव्हती, अशा ठिकाणी पाच ते सहा फूट पाणी आल्याने अनेक नागरिक महापुरात अडकले. अशा वेळी प्रशासनाच्या पोकळ दाव्यांवर अवलंबून न राहता कोल्हापूरची तरुणाई रस्त्यावर उतरली आणि मदतकार्य सुरू केले. कुणी तराफा तयार केला, कुणी रिक्षाचा हूड उलटा करून त्यात टायर ट्यूब ठेवल्या, एवढेच काय स्मशानभूमीतून वाहून आलेल्या काठ्यांचा तराफा आणि वल्हे तयार करून वृद्ध, महिला आणि मुलांना पुरातून बाहेर काढले.

रविवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडले होते. हे पाणी हळूहळू वाढत होते. जोरदार पाऊस असूनही जिल्हा प्रशासन केवळ महापालिकेच्या अग्निशमन दलावर अवलंबून होते. कोल्हापूर आणि आसपासच्या गावांत भयंकर परिस्थिती असतानाही एनडीआरएफला बोलवायला दोन दिवस गेले. त्यामुळे नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागला.

गेले दोन दिवस कोल्हापुरातील तरुण आणि सामाजिक संस्था अखंड बचावकार्य करत आहेत. ज्या ठिकाणी जाणे शक्य आहे, आणि जिथे नागरिक आहेत तेथे खाण्याचे पदार्थ पोहोचवत आहेत. सोशल मीडियावर आपला पत्ता आणि मोबाइल नंबर शेअर करून राहण्यास येण्याचे आवाहन करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like