‘कोरोना’ग्रस्त कुटुंबांना 50 हजार रूपये द्या, अभिजित बिचुकलेंची उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरात सुद्धा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असतानाच ग्रामीण भागात याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गित रुग्णाच्या कुटूंबीयांना राज्य सरकारने तात्काळ ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी, बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

बिचुकले यांनी म्हटलं आहे की, कोरोना संसर्गित रुग्ण व त्यांच्या कुटूंबास समाजातील इतर घटकांकडून तुच्छतेची वागणूक मिळत आहे. कोरोना संसर्गित रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात येतो. तिथे सामाजिक स्तरावर ये-जा करता येत नाही. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाशी इतर लोक व्यवहार करण्यास टाळाटाळ करतात. एखाद्या कुटूंबात बाधित रुग्ण आढळला तर खाजगी मालक कर्मचाऱ्याला कामावरुन कमी करत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. म्हणून उपासमार टाळण्यासाठी पन्नास हजार रुपयांचे मानधन कोरोना संसर्गित रुग्णांना मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच हेल्मेटसक्तीचा आदेश तात्काळ रद्द करण्याची, विनंती त्यांनी केली आहे.

साताऱ्यात रुग्णसंख्या वाढतीच

दरम्यान, शनिवारी सातारा जिल्ह्यात ५७५ रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत १२ हजार २१८ जणांना याची लागण झाली. तर ६ हजार ७८७ रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं. सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ७४ आहे. कोरोना संसर्गित एकूण ३५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मागील चार पाच महिन्यांपासून मेडिकल दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आलेला. आता ही अट रद्द करण्यात आली असून नवीन आदेशानुसार पूर्ण वेळ मेडिकल दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी शेखर यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार पूर्णवेळ मेडिकल दुकान सुरु राहणार असल्याने अन्य आजारांच्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.