‘कांदा साठा तपासायला कुणी अधिकारी आला तर दांडक्याने सोलून काढा’ : सदाभाऊ खोत

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन –  माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot) यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. केंद्र सरकारने शेतीमाल साठवणुकीवरील निर्बंध उठवले आहेत, तरीही कुणी कांदा साठा तपासायला सरकारी अधिकारी आलाच तर त्याला चोराप्रमाणे दांडक्याने सोलून काढा अशा सूचना शेतकरी आणि कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे विधान केलं असून यावेळी राज्यात तातडीने ओला दुष्काळ ( Wet drought) जाहीर करावा, सरसकट नुकसान भरपाई द्यावी, पीक कर्ज माफ करावे आणि उसाची एफआरपी एकरकमी द्यावी अशा विविध मागण्या सरकारकडे केल्याचेही म्हणाले.

यावेळी राज्यातील ओल्या दुष्काळावर अधिक बोलताना ते म्हणाले, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. कापूस, सोयाबीन, भुईमूग यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना आता तातडीच्या मदतीची गरज आहे , यामुळे कोरडवाहू शेतीला प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये तर बागायती शेतीला प्रति हेक्‍टरी एक लाख रुपयांची मदत करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर राज्य सरकारच्या केंद्राकडे मदत मागण्याच्या मागणीवर बोलताना प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट दाखवणे म्हणजे रणांगणातून पळ काढण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली आहे.

केंद्र जेव्हा देईल तेव्हा शेतकऱ्यांना सर्व रक्कम द्या, पण तोपर्यंत पहिला हप्ता म्हणून राज्य सरकारने आपल्या निधीतून शेतकऱ्यांना मदत करायला हवी.शरद पवार ( Sharad Pawar) यांनी मागील सरकारकडे ज्याप्रमाणे मागण्या केल्या होत्या. तशाच प्रकारची मदत त्यांनी शेतकऱ्यांना करावी असे दखील सदाभाऊ खोत यांनी म्हटले.दरम्यान, कांद्याच्या प्रश्नावर बोलताना खोत यांनी खोत केंद्र सरकारने साठवणुकीवरील निर्बंध उठवले आहेत, तरीही काही ठिकाणी सरकारी अधिकारी छापा टाकत आहेत. कांदा साठवणुकीवर कुणी छापा टाकलाच तर त्याला शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी हातात दांडके घेऊन चोराप्रमाणे सोलून काढावे अशा सुचना आपण दिल्या असल्याचे म्हटले आहे. कारवाईच्या भीतीने व्यापारी कांदा खरेदी बंद करतील, त्यामुळे त्याचे भाव पडतील, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल म्हणून साठ्याला निर्बंध घालू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे त्याच्या या मागणीवर सरकारची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.