जिचं सांत्वन केलं तिच महिला निघाली ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

कसबा बीड : पोलीसनामा ऑनलाइन – करवीर तालुक्यातील कांचनवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैत्रीणीच्या पतीचे निधन झाल्याने सांत्वन करण्यास गेलेल्या १९ महिलांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे. यातील एका महिलेचा धाप वाढल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी चाफोडी (ता.करवीर) येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या पत्नीचे कांचनवाडी व चाफोडीत सलोख्याचे संबंध आहेत. शेतातली खुरपणी पासून इतर कामांसाठी ही महिला कांचनवाडी येथे कामाकरिता जात होती. त्यामुळे सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. ग्रामीण भागात गावात कोणाचाही मृत्यू झाला की त्याच्या नातेवाईकांना बोलवायला (सांत्वन करायला) महिला मोठ्या प्रमाणात जात असतात.

मात्र, ज्या महिलेचे सांत्वन करण्यासाठी या महिला गेल्या होत्या. त्या महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचा स्पष्ट झालं आणि सर्व महिलांचा काळजाचा ठोकाच चुकला. ही गोष्ट आरोग्य विभागाच्या लक्षात येताच तातडीने या महिलांना त्यांच्या घरातून थेट कोरोना संसर्ग कक्षात विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व गावात एकच खळबळ उडाली.