कोल्हापूरात मद्यधुंद तरुणांचा पोलिसांवर हल्ला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जीवबा नाना पार्क येथे मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्यांना अटकाव करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अविनाश शंकर गवळी (वय ३४, रा. लक्षतीर्थ वसाहत), अभिजित शीतलकुमार जिरगे (वय ३०, रा. लिशा हॉटेल) आणि विलास विजय पाटील (वय ३२, रा. रंकाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जिवबा नाना पार्क येथील एका हॉटेलमध्ये अविनाश गवळी व त्याचे सहा मित्र जेवणासाठी गेले होते. सगळे मद्यधुंद अवस्थेत या ठिकाणी गोंधळ घालत आरडाओरडा करीत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यावरुन करवीर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे आणि पोलीस शिपाई रणजित शिंदे हे होमगार्डसमवेत घटनास्थळी गेले. त्यांनी या तरुणांना हटकून घरी जाण्यास सांगितले. त्यावर त्यांनी सहायक फौजदार शिंदे यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यात शिंदे यांच्या हाताला मार लागला. त्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवून तिघांना ताब्यात घेतले. त्याचे इतर चार मित्र पळून गेले.

दुसऱ्या घटनेत राजारामपुरी भागात दारु पिऊन जाणाऱ्यास अडविल्याच्या रागातून दोघांनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करण्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी नीलेश चंद्रकुमार गंगवाल (वय ४४, रा. साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ), सुशांत प्रकाशराम देशमुख (वय ४३, रा. शिवतारा अपार्टमेंट, प्रतिभानगर) यांना अटक केली आहे.

याप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई राहुल पंडित कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. कांबळे हे राजारामपुरी जनता बझार चौकात सायंकाळी वाहतूक नियंत्रण करीत होते. त्यावेळी नीलेश व सुशांत हे सिग्नलच्या उलट दिशेने वेडेवाकडी दुचाकी चालवत चौकात आले. ते पाहून नीलेश कांबळे यांनी त्यांना थांबवून लायसन्स मागितले. यावेळी दोघांनी त्यांच्या अंगावर धावत जात त्यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहून चौकातील इतर पोलीस धावत तेथे गेले व त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. सरकारी कामात अडथळा, मद्य पिऊन गाडी चालविणे अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

Visit : policenama.com