ममता बॅनर्जींच्या भाच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी भाजप कार्यकर्त्याला अटक !

पोलीसनामा ऑनलाइन – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या प्रकरणी एका भाजप कार्यकर्त्याला अटक झाली आहे. उत्तर 24 परगना जिल्ह्यातील 24 वर्षीय भाजप कार्यकर्ता सुभदीप दास याला अटक करण्यात आली आहे. हावडा पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी सायंकाळी हावडा पोलीस ठाण्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणी कारवाई केली आहे. आयटी अ‍ॅक्टच्या विविध कलमांनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कलम 504 (शांतता भंग करण्याच्या उद्देशानं जाणून बुजून एखाद्याचा अपमान करणं), 505 ( खोटी वक्तव्ये करणं किंवा सार्वजनिक शांती भंग करण्यासाठी अफवा पसरवणं) अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे. यानंतर आरोपी सुभदीप दास याला गुरुवारी बारासात न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

या घटनेनंतर आता भाजपकडून मात्र पोलिसांवर अतिसक्रियतेचा आरोप करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून सुनियोजित पद्धतीनं भाजप कार्यकर्त्यांना अशा प्रकरणात अडकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

पोलीस कायद्याचं पालन करत असल्याची प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसचे नेत निलिमेश दास यांनी दिली आहे. बंगाल भाजपच्या प्रभारींना जर स्वत:च्या राजकीय विरोधकांचा सन्मान करता येत नसेल तर साहजिकच पक्षाचे कार्यकर्ते देखील त्यांचंच अनुकरण करणार अशी बोचरी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आमच्या सन्मानीय खासदारांना भाजप कार्यकर्त्याकडून शिवीगाळ करण्यात आली होती. आपला राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी भाजप फेसबुकचा कशा पद्धतीनं वापर करत आहे हे संपूर्ण देशाला आज माहित आहे. पोलिसांनी योग्य तीच कारवाई केली आहे. जर भविष्यात कोणी अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्याच्यावरही अशीच कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले आहेत.