पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा ममतांच्या सरकारवर ‘गंभीर’ आरोप

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनखड आणि तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. भोजनाचे निमंत्रण देऊन ऐनवेळी रद्द करत विधानसभेची दारेच बंद केल्याचा आरोप केला आहे. राज्यपालांनी पश्चिम बंगालमध्ये अशी लोकशाही चालणार नाही. हा माझा अपमान आहे. राज्यात अनेकदा माझा अपमान करण्यात आला आहे आणि हा एक कट आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता लगावला.

विधानसभा अध्यक्षांनी राज्यपाल जगदीप धनखड़ यांना गुरुवारी विधानसभेमध्ये स्नेहभोजनासाठी बोलावले होते. मात्र, ऐनवेळीच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्याचबरोबर विधानसभा दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. जेव्हा राज्यपाल विधानसभेत जाण्यासाठी आले तेव्हा त्यांना गेट बंद दिसले. यामुळे त्यांनी दुसऱ्या गेटने विधानसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या गेटवर त्यांना काही काळ उघडण्याची वाटही पहावी लागली. नंतर पहिल्या गेटनेच ते आत गेले.

पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. कोलकाता पोलिस आयुक्तांवरील कारवाईवरून मुख्यमंत्री बॅनर्जी रात्रभर आंदोलनाला बसल्या होत्या. काही दिवसांपूर्वी ममता यांनी माझ्यावर अभद्र टिप्पणी केली आहे असा आरोप राज्यपालांनी मुख्यमंत्री बॅनर्जींवर केला होता.