तरूणीनं ‘लॉकडाऊन’ तर मोडलंच वर पोलिसांनाच ‘चावून’ काढलं ‘रक्त’ (व्हिडिओ)

कोलकता : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. त्यामुळेच या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लोकांना केवळ आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, असे असले तरी अनेक लोक नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र, लोकांकडून पोलिसांसोबत हुज्जत घातली जात आहे. असाच एक प्रकार कोलकतामध्ये घडला असून एका तरूणीने कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाचा चावा घेऊन रक्त काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोलकतामधील एका महिलेने पोलीस अधिकाऱ्याचा चावा घेतला. पोलिसांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर महिलेने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसांसोबत हुज्जत घालत असताना महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या पोटाचा चावा घेतला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या महिलेवर टीका होत आहे. लॉकडाऊन असताना रस्त्यांवर फिरत असताना पोलिसांनी चौकशीसाठी तिला थांबवले, तिच्याकडे चौकशी करत असताना तिने पोलिसांवर हल्ला केला. हा प्रकार 25 मार्च रोजी दुपारी साडे बाराच्यासुमारास घडला.

पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता तिने औषधं घेण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले. पोलिसांनी महिलेकडे औषधांची बिले मागितल्यावर तिने पोलिसांसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. एका पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला पोलिसांनी काही प्रश्न विचारले. मात्र ती तिच्या वाहनातून खाली उतरली आणि आमच्या एका सहकाऱ्यावर हल्ला केल्याचे सांगितले. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसावर हल्ला केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशावर रक्ताचे डाग पडल्याचे दिसून येत आहे. महिलेवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.