सोसायटी जागा बळकाविण्याचा करतेय प्रयत्न ?

बांधकाम व्यावसायिकाचा दावा, सोसायटी म्हणते जागा आमचीच

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – कोंढव्यातील साईबाबानगर येथील गगन इमरल्ड या इमारतीची सीमा भिंत धोकादायक झाल्याने महापालिकेने पाडण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे बांधकाम व्यावसायिकाने भिंत पाडली. त्यावरुन बांधकाम व्यावसायिक आणि सोसायटीत वाद सुरु झाला आहे. त्यात कोंढव्यातील राजकीय व्यक्तींनी उडी घेतल्याने हा वाद आता चांगलाच पेटला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघांना 149 ची नोटीस दिली होती. तरी देखील सोसायटीच्या लोकांनी भिंत बांधली.

गगन इमरल्ड या इमारतीच्या जवळ असलेली जागा सोसायटी बळकाविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा बांधकाम व्यावसायिक सुशिल अग्रवाल यांनी केला आहे.

ही जागा सोसायटीचे विविध प्रकल्पांसाठी आहे. सध्या ही जागा सोसायटीच्या ताब्यात आहे. बांधकाम व्यावसायिकाने ही जागा अनिस सुंडके यांना विकली असून त्यातूनच ते दावा करीत आहेत, असे  सोसायटीचे चेअरमन हनिफ शेख उर्फ (मीटर) यांचे म्हणणे आहे.

भिंत पडून शहरात पावसाळ्यात अनेक मजूरांचे बळी गेल्यानंतर महापालिकेने सर्व शहरात पाहणी करुन धोकादायक सिमाभिंती पाडण्याचे आदेश दिले होते. त्यात या गगन प्रॉपर्टीजचा समावेश होता.

याबाबत बांधकाम व्यावसायिक सुशिल अग्रवाल यांनी सांगितले की, गगन इमरल्ड या सोसायटीची सीमाभिंत धोकादायक झाल्याने महापालिकेने नोटीस बजावली होती. त्यानुसार आपण ही भिंत पाडण्याकरीता रफिक टोपी यांना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी ही धोकादायक भिंत पाडली. गगन इमरल्ड या फेज १ चे काम २०१३ मध्ये पूर्ण झाले आहे. फेज २ चे काम अद्याप बाकी आहे. ही संपूर्ण जमीन २३ हजार ८५० चौ़ मीटर असून त्यापैकी १९ हजार ९८५ चौ मीटर या क्षेत्रफळावर इमारत बांधलेली आहे. ही इमारत सोसायटीला हस्तांतरीत करायला तयार आहे. मात्र सोसायटी व फ्लॅटधारक इमारतीसह सर्व २३ हजार ८५० क्षेत्रफळ हस्तांतरीत करुन मागत आहे. इमारती व्यतिरिक्त अन्य जागा ही आपल्या मालकीचे आहे. त्याबाबत दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे. या ठिकाणी वहिवाटीला अडचण असल्याने ही सीमाभिंत बांधण्यास आपला विरोध असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. काही लोकांना हाताशी धरुन सोसायटीतील लोकांना गफूर पठाण हे भडकावित असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला आहे.

त्यावर सोसायटीचे चेअरमन हनिफ शेख यांनी सांगितले की, ही जागा सोसायटीच्या ताब्यात असून त्याठिकाणी सोसायटीचे एसटीपी प्लँट, पार्किंग, बाग इत्यादी सुविधा बांधकाम व्यावसायिक करुन देणार होते. मात्र, त्यांनी त्या करुन दिलेल्या नाहीत. अग्रवाल यांनी ही जागा आपल्याला विकली असल्याचे अनिस सुंडके यांनी सांगितले असून त्याप्रमाणे आपले अग्रवाल यांच्याबरोबर अग्रिमेंट झाल्याचे त्यांनी आपल्याला सांगितले आहे. अग्रवाल यांनी सीमाभिंत पाडली. पण परत बांधून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सोसायटीमध्ये चोऱ्या होण्याची व कोणीही येण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यावसायिकाने भिंती बांधून न दिल्याने शेवटी सोसायटीला फ्लॅटधारकांच्या सरंक्षणासाठी सिमाभिंत बांधून घ्यावी लागत आहे.

याबाबत नगरसेवक गफूर पठाण यांनी सांगितले की, बांधकाम व्यावसायिक अग्रवाल यांच्याविषयी सोसायटीतील फ्लॅटधारकांच्या तक्रारी आहेत. अग्रवाल यांनी वनटाईम मेंटनन्स सोसायटीला दिला नाही. तसेच अभिहस्तांतरण करुन दिले नाही. सोसायटीला बाग, पार्किंग, एसटीपी प्लँट अशी अनेक आश्वासने दिली होती. ती पूर्ण केली नाही. नगरसेवक असल्याने लोक आमच्याकडे तक्रारी घेऊन येत असतात. आपला त्यांच्याशी काही संबंध नसल्याचे गफूर पठाण यांनी सांगितले.

Visit : Policenama.com