धावत्या रेल्वेचे डबे सुटल्यामुळे प्रवाशांनी अनुभवला थरार

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – वेगाने जात असलेल्या करमाली एक्सप्रेसमधील प्रवासी बाहेरच्या निसर्गाचा आस्वाद घेत होते. त्याचवेळी अचानक गाडीला हिसका बसतो आणि रेल्वे ज्या वेगाने धावत होती, त्याच वेगात ती पटकन थांबते. प्रवाशांना हादरा बसतो. गाडी का थांबली म्हणून प्रवासी बाहेर डोकावून पहातात तर काही अंतरावर इंजिन एकटे पुढे वेगाने जात असलेले त्यांना दिसते आणि मोठ्या अपघातातून आपण वाचल्याचा सुस्कारा प्रवासी सोडतात.

कोकण मार्गावर धावणाऱ्या हॉलिडे स्पेशल सीएसएमटी करमाली एक्सप्रेस गाडीचा अपघात टळला. करमालीवरून येतांना सिंधुदुर्ग दरम्यान अचानक धावत्या इंजिनने डबे सोडले. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली मात्र थोड्या वेळात इंजिन चालकाला घटनेची जाणीव झाल्यानंतर इंजिन डब्यांना पुन्हा जोडण्यात आले. त्यामुळे कोंकण मार्गांवर रेल्वेचा मोठा अपघात टळला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून करमालीसाठी विशेष हॉलिडे ट्रेन सुटते, तीच ट्रेन रविवारी रोजी करमाली वरून सिएसएमटी परत येत होती. कणकवली ते सिंधुदुर्ग दरम्यान रविवारी अचानक धावत्या एक्स्प्रेसच्या इंजिनने डबे सोडून इंजिन पुढे गेले. मात्र प्रवासी डबे सुरक्षित रुळावर उभे राहिल्याने मोठा अपघात टळला. हजारो प्रवासी यावेळी एक्सप्रेस मध्ये होते. या घटनेची चालकाला जाणीव होताच त्यांनी इंजिन थांबवून त्याला डब्याशी जोडले. त्यांनतर गाडीला सिएसएमटी स्थानकावर सुरक्षित पोहचविण्यात आले. दरम्यान त्यामुळे प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. तर भीतीचे वातावरण सुद्धा होते.

कोंकण रेल्वेने ही घटना गंभीर घेतली आहे. तांत्रिक कारणामुळे इंजिन आणि डब्याचे कपलिंग सुटले. मात्र हे नेमके कशामुळे झाले यासंदर्भात कोकण रेल्वेने चौकशीचे आदेश दिले असल्याचे कोकण रेल्वेच्या अधिकऱ्यांनी सांगितले.