धक्कादायक ! भरदिवसा घरात घुसून वृद्धाचा खून

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन-कोपर खैरणे येथे घरात घुसून एका वृद्ध इसमाचा खून करुन मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास कोपर खैरणे सेक्टर १४ येथील कृष्णा टॉवर मधील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर घडली. या घटनेत जखमी झालेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा हल्ला कोणत्या कारणामुळे आणि कोणी केला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

विजयकुमार दाहोत्रे (वय ६२) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा निखिल जखमी झाला आहे. आज दुपारी इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील घरात दोघेच असताना हा प्रकार घडला. अचानक घरामध्ये घुसलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी विजयकुमार यांना मारहाण करून घरातील लोखंडी वस्तू त्यांच्या डोक्यात मारल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मुलाला देखील मारहाण झाली असून त्यात तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव यांच्यासह कोपर खैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या हल्यामागचे नेमके कारण मात्र अद्याप कळू शकलेले नसल्याचे सहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव यांनी सांगितले. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस परिसरातील तसेच इमारतीमधील सीसीटीव्ही तपासत आहेत.

जाहिरात

You might also like