कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास केंद्राकडे कधीही देणार नाही : मुख्यमंत्री ठाकरे

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी सांगितले की, कोरेगाव – भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोरेगाव – भीमा प्रकरणात महाराष्ट्रातील दलित बांधवांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले असून हा तपास केंद्राकडे कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंनी सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना या प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास स्वतःकडे घेतला आहे. परंतु कोरेगाव – भीमा हिंसाचाराचा तपास मी केंद्राकडे देणार नाही. कारण तो माझ्या दलित बांधवांचा प्रश्न आहे. असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

कालच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली या बैठकीत एल्गार परिषद आणि कोरेगाव – भीमा हिंसाचार प्रकरणाबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआयए कडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे शरद पवार नाराज असल्याचे दिसून आले होते. कारण शरद पवारांचे म्हणणे होते की या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून करण्यात यावा. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे आता एल्गार परिषद प्रकरणावरून राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी एनआरसी, सीएए आणि एमपीए बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. हे तिन्ही विषयही वेगवेगळे असल्याचं ते म्हटले. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत त्यांनी भाष्य केले, ते म्हणाले की शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला नेहमीच विरोध होता आणि राहणारच. त्यामुळे नाणार प्रकल्प सुरू होणार नाही अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेची घोषणाही त्यांनी केली. या योजनेच्या माध्यमातून हॉस्पिटल, पूर, घरबांधणी, दुष्काळ, पर्यटन, नळपाणी योजना, आणि डिझेलचा परतावा आदी कामे केली जाणार आहेत असे ते म्हणाले. दरम्यान यावेळी खासदार विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब आणि उदय सामंत आदी नेते देखील उपस्थित होते.