कोरेगाव-भीमा प्रकरण : नवलखा यांना उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवार वाड्यात झालेल्या एल्गार परिषदेमुळे कोरेगाव भीमा येथे दुसऱ्या दिवशी हिंसाचार घडला. या प्रकरणी संशयित असलेल्या गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला. न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने गडचिरोलीतील हल्याच्या पार्श्‍वभूमीवर नवलखा यांना उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा रद्द करण्याची राज्य सरकारची विनंती फेटाळून लावत याचिकेवर सुनावणी येत्या १२ जून पर्यंत तहकूब ठेवली. तो पर्यंत त्यांच्या विरोधात कारवाई न करण्याचे न्यायालयाने या पूर्वी पुणे पोलीसांना दिलेले आदेश कायम ठेवले.
अर्बन नक्षलवादाशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करुन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी झाली.

यावेळी राज्य सरकारच्यावतीने सरकारी वकील ऍड. अरूणा कामत पाई यांनी सरकारची बाजू मांडली. मात्र न्यायालयाने राज्य सरकारची ही विनंती अमान्य करत या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जून पर्यंत तहकूब ठेवली.