कोरेगाव भीमाची माती अयोध्येत राममंदिर पायाभरणीला; क्रांतीवीर दौलती नाईक व स्वातंत्र्यसेनानी मारुती भांडवलकर स्मृतीकलशाचे पुजन

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय स्वातंत्र्यपुर्व लढा व स्वातंत्र्यलढ्यातील संग्रामात कोरेगाव भीमाचा इतिहास मोठा असुन आद्य क्रांतीचीर राजे उमाजी नाईक यांच्या नंतर बंडाचे निशान ज्यांनी हातात घेतले ते क्रांतीवीर दौलती नाईक व स्वातंत्र्यसेनानी कै. मारुती भिमाजी भांडवलकर यांच्या स्मृतीचे माती कलश अयोध्येतील राममंदिर पायाभरणीसाठी जाणार असल्याने कोरेगाव भीमाचा इतिहास सोनेरी अक्षरात नोंदविला जाईल असे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथिल क्रांतीवीर दौलती नाईक व स्वातंत्र्यसेनानी कै. मारुती भिमाजी भांडवलकर यांच्या स्मृतीचे माती कलश अयोध्येतील राममंदिर पायाभरणीसाठी पाठविण्यात आले. यावेळी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक क्षत्रिय रामवंशी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य पि. के. गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, संगिता कांबळे, बबुशा ढेरंगे, समिर इनामदार, लक्ष्मण भंडारे, रमेश भंडलकर, संपत माकर, किरण चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रामदास भंडलकर, वंदना गव्हाणे, सिमा भंडलकर, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले पोलीस पाटिल मालन गव्हाणे व ग्रामस्थ मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

यावेळी अधिक बोलताना आप्पासाहेब चव्हाण यांनी सांगितले की,‘ कोरेगाव भीमातील या दोन क्रांतिकारकांच्या स्मृती जतन करण्याचे काम गावाचेही असुन ग्रामस्थांनी अद्यावत स्मारक उभे करण्याची गरज असल्याचे सांगितले. तर पि. के. गव्हाणे यांनी सांगितले की,‘ कोरेगाव भीमाचे नाव इतिहासात भांडवलकर परिवाराने सुवर्णाक्षरांनी नोंदविण्याचे काम केले. अशा क्रांतिकारांचे स्मरण अयोध्येतील राममंदिराच्या पायाभरणीसाठी होणे हे कोरेगाव भीमातील ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद बाब आहे. स्वागत मधुकर कंद यांनी तर प्रास्तविक किरण चव्हाण यांनी केले. आभार सुनिल भांडवलकर यांनी मानले.

कोरेगाव भीमात उभे राहणार स्मृतीसभागृह
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथिल क्रांतीवर दौलती नाईक व स्वातंत्र्यसेनानी मारुती भीमाजी भांडवलकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी सभागृह बांधण्याबाबत ग्रामपंचायतीच्यावतीने निधी टाकण्यात आला असुन त्याची निविदाही प्रसिध्द करण्यात आली असल्याने थोड्याच दिवसात क्रांतीकारकांचे स्मृतीसभागृह उभे राहिल असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले यांनी सांगितले.