BJP आमदाराचं ‘वादग्रस्त’ विधान, म्हणाले – ‘शेतकरी आंदोलनामुळं पसरत आहे बर्ड फ्लू’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना (Kisan Andolan) दरम्यान भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि रामगंजमंडीचे आमदार मदन दिलावर ((BJP MLA Madan Dilawar) यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. दिलावर यांनी आरोप केला आहे की शेतकरी चळवळीत बसलेले शेतकरी दररोज चिकन बिर्याणीसह अन्य स्वादिष्ट भोजनाच्या पार्ट्या करत आहेत. यामुळे बर्ड फ्लूचा( bird flu) धोका सातत्याने वाढत आहे. देशात बर्ड फ्लू पसरविण्यात या शेतकरी आंदोलनाचा मोठा हात आहे. एवढेच नव्हे तर शेतकरी आंदोलनात सामील असलेल्या लोकांमध्ये दहशतवादी लपले असल्याची शक्यताही दिलावर यांनी व्यक्त केली. त्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की एवढ्या मोठ्या संख्येने तळ ठोकून बसलेल्या आंदोलनकर्त्यांना आता सरकारने रस्त्यावरुन उठवले पाहिजे अन्यथा बर्ड फ्लूसारख्या प्राणघातक रोगाचा प्रसार करणारे शेतकर्‍यांचे हे तथाकथित आंदोलन देशात मोठे संकट निर्माण करेल.

दिल्लीत एका महिन्याहून अधिक काळ आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांशी केंद्र सरकार सतत चर्चा करून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु यादरम्यान भाजपा नेते मदन दिलावर यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकारण तापण्याच्या मार्गावर आहे. मदन दिलावर यांचे हे विधान सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

शेतकरी नेत्यांनी केला तीव्र निषेध

भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मदन दिलावर यांच्या वक्तव्याचा शेतकरी नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. या नेत्यांनी मदन दिलावर यांच्यावर जातीय सौहार्द बिघडवल्याचा आरोप केला आहे. अखिल भारतीय किसान महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष दुलीचंद बोरदा यांनी मदन दिलावर यांनी केलेल्या विधानावर पलटवार केला आहे. बोरदा म्हणाले की, मदन दिलावर व भाजपा नेते सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकशाही पद्धतीने वक्तव्य करून शेतकरी आंदोलन संपविण्याचे प्रयत्न केले जात आहेत, परंतु भाजपा नेत्यांच्या वक्तव्यांचा आंदोलनावर परिणाम होणार नाही. मागणी पूर्ण होईपर्यंत शेतकरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही. बोरदाने मदन दिलावर यांच्यावर आरोप करत म्हटले की त्यांचा जनाधार सातत्याने कमी होत आहे, अशा परिस्थितीत ते केवळ अशी विधाने करून मथळे बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत.