… म्हणून कोरोनाबाधित आजी-आजोबांची रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या

कोटा : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच राजस्थानच्या कोटा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाची बाधा झालेल्या एका वृद्ध दाम्पत्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. कारण आपल्यामुळे आपल्या नातवालाही कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीपोटी दाम्पत्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी (दि. 2) सायंकाळी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दाम्पत्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

हीरालाल बैरवा (वय 75) आणि त्यांची पत्नी शांती बैरवा (वय 75) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. पोलीस उपाधीक्षक भगवत सिंह हिंगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटा शहरातील रेल्वे कॉलनी परिसरात राहणारे हीरालाल बैरवा आणि शांती बैरवा यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे दोघेही तणावाखाली होते. त्यांनी घरीच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्यामुळे आपला नातू रोहितला कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती त्यांना होती. रविवारी कुटुंबीयांना काहीही न सांगता हे दाम्पत्य घरातून निघून गेले. त्यानंतर त्यांनी कोटाहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे समोर उडी टाकून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह रुग्णालयामध्ये नेले. प्राथमिक तपास केल्यानंतर या दाम्पत्याच्या मुलाचे 8 वर्षापूर्वी निधन झाल्याची माहिती मिळाली. तसेच आपल्यामुळे नातवाला कोरोनाचा संसर्ग होईल, अशी भीती या दोघांच्या मनात होती, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.