‘या’ आहेत देशातील सर्वांत ‘श्रीमंत महिला’, जाणून घ्या कोणाकडे किती ‘संपत्ती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एचसीएल टेक्नॉलॉजीज (HCL Technologies) च्या अध्यक्षा रोशनी नादर मल्होत्रा (Roshni Nadar Malhotra) देशातील सर्वांत श्रीमंत महिला आहेत. गुरुवारी, ‘कोटक वेल्थ हुरुन-लीडिंग वेल्दी वूमन’ लिस्ट 2020 मध्ये रोशनी नादर यांचे नाव देशातील सर्वांत श्रीमंत महिलांमध्ये शीर्षस्थानी आहे. या यादीनुसार रोशनीकडे एकूण 54,850 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्या सध्या एचसीएल कॉर्पोरेशन (HCL Corporation) च्या सीईओ आणि कार्यकारी संचालक आहेत. ही एचसीएल टेक आणि एचसीएल इन्फोसिस्टिम्सची होल्डिंग कंपनी आहे.

या यादीतील सर्व महिलांची सरासरी मालमत्ता 2,725 कोटी रुपये आहे, तर या यादीमध्ये सर्वांत शेवटी असलेल्या महिलेची संपत्ती किमान 100 कोटी रुपये आहे. या अहवालात म्हटले आहे की, या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या बहुतांश महिलांनी कोविड -19 च्या संकटात तत्परतेने आपले योगदान दिले आहे आणि गरजूंना मदत केली आहे.

या महिलांचादेखील या यादीत समावेश आहे

या यादीत किरण मजुमदार शॉ (Kiran Mazumdar Shaw) दुसर्‍या क्रमांकावर आहेत. मजुमदार शॉ बायोकॉनच्या संस्थापिका आहेत आणि त्यांची मालमत्ता 36,600 कोटी रुपये इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर यूएसव्ही (USV) च्या अध्यक्षा लीना गांधी तिवारी (Leena Gandhi Tewari) आहेत. त्यांच्याकडे 21,340 कोटींची संपत्ती आहे. यूएसव्ही ही डायबिटिज आणि कार्डिओव्हस्क्युलर मेडिसिनच्या क्षेत्रातील एक कंपनी आहे.

या यादीमध्ये नीलिमा मोटापर्ती (Nilima Motaparti) 18,620 कोटी रुपयांच्या संपत्तीसह चौथ्या आणि राधा वेम्बू (Radha Vembu) 11,590 कोटी रुपयांच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आहेत. मोतापर्ती या डिवी लॅबोरेटरीजच्या संचालिका आहेत, तर वेम्बू यांचा झोहो कॉर्पोरेशन (Zoho Corporation) मध्ये हिस्सा आहे.

8 महिलांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले आहे

या यादीतील 8 महिलांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, तर 31 महिलांनी स्वत:च्या हिमतीवर हे स्थान मिळवले आहे. 6 महिला प्रोफेशनल्स मॅनेजर्स आणि 25 महिला उद्योजिका आहेत.

मुंबईमध्ये आहेत सर्वाधिक श्रीमंत महिला

सर्व क्षेत्रांविषयी बोलायचे झाले तर 13 महिला फार्मास्युटिकल्स, 12 महिला कापड व वस्त्र उद्योग आणि 9 महिला आरोग्य सेवा क्षेत्रातील आहेत. फार्मा क्षेत्रातील 12 महिलांमध्ये मजुमदार शॉ या एकमेव सेल्फमेड महिला आहेत. शहरानुसार बघितले तर या यादीतील 32 महिला आर्थिक राजधानी मुंबईतील आहेत. नवी दिल्लीतील 20 आणि हैदराबादमधील 10 महिला आहेत.