पुणे : तब्बल १७ वर्षांनी मुद्देमाल कक्षात पडून असलेल्या सांगाड्यावर अंत्यसंस्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मागील १७ वर्षांपासून कोथरूड पोलीसांच्या मुद्देमाल कक्षात पडून असलेल्या एका तरुणाच्या सांगाड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २००२ साली तरुणाचा एमआयटीच्या टेकडीवर तरुणाचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर या खून प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटकादेखील झाली. मात्र तरुणाच्या हाडांचा सांगाडा तसाच पोलिसांच्या मुद्देमाल कक्षात पडून होता.

२००२ साली झाला होता खून
कोथरुड परिसरातील एमआयटीच्या पाठीमागे असलेल्या टेकडीवर २००२ साली एका तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविण्यास अचडण येत होते. तब्बल दोन वर्षांनी गुन्हे शाखेच्या पथकाने या खुनाचा उलगडा केला. त्यांन तरुणाची ओळख पटविली. त्यावेळी तो मृतदेह सोळा वर्षीय निखील रणपिसे याच असल्याचे समोर आले होते.

चोरीचा माल वाटण्यावरून झाला होता खून
याप्रकरणी निखीलच्या दोन मित्रांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत निखील आणि त्याच्या मित्रांनी एका नातेवाईकाच्या घरात चोरी करून चोरलेल्या ऐवजाचे वाटप करायचे होते. त्यावेळी त्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादात त्याचा खून इतर दोघांनी केल्याचे निष्पन्न झाले होते.

दोघे निर्दोष सुटले
पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयात याप्रकरणी खटला सुरु होता. त्यावेळी सबळ पुराव्याअभावी दोघांनाही न्यायालयाने २००६ मध्ये निर्दोष मुक्त केले होते. निकालात न्यायालयाने निखीलच्या सांगाड्यावर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले होते. परंतु तत्कालीन अधिकाऱ्याची बदली झाली आणि निखीलचा सांगाडा तसाच पडून होता.

मुद्देमाल खोली साफ करताना सापडला धूळ खात पडलेला सांगाडा
शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांतील धूळ खात पडलेल्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांनी दिले होते. त्यावेळी कोथरुड पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षात धूळ खात पडलेला निखीलचा सांगाडाही त्यात होता. मात्र याप्रकरणातील न्यायालयाच्या आदेशाची प्रत पोलिसांकडे नव्हती. त्यामुळे कोथरूड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर खटके यांनी पुढाकार घेऊन रणपिसेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र त्याचे वडिल ८५ वर्षांचे आहेत. आजारपणामुळे ते अंथरुणाला खिळून आहेत. त्यामुळे त्यांनी अंत्यसंस्कार करण्यास असमर्थता दर्शवली. मात्र आपण अंत्यसंस्काराला हजर राहू असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून पुन्हा आदेश मिळवून सांगाड्यावर अंत्यसंस्कार विद्यूत दाहिनीत अंत्यसंस्कार केले.