कोथरूड सांस्कृतिक महोत्सव आजपासून रंगणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दरवर्षीप्रमाणे यंदाही रसिकांसाठी ‘संस्कृती प्रतिष्ठान’च्या वतीने वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी सजलेला ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सव २०१९’चे आयोजन २८ ते ३१ जानेवारी दरम्यान सायं ६.३० वाजता ‘आयडियल कॉलनी’ येथील मैदानावर करण्यात आले आहे. या महोत्सवात ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘चला हवा येवू द्या’, ‘स्वरत्रिवेणी’, आणि ‘स्वरतरंग’ असे बहारदार कार्यक्रमांचा रसिकांना आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचे नवनाथ जाधव व दिनेश माथवड उपस्थित होते.

या महोत्सवाचे उदघाटन २८ जानेवारी रोजी सायं साडे सहा वाजता ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावर्षी ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खांन यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना ‘संस्कृती कला पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी दिग्दर्शक महेश कोठारे यांचा जीवनप्रवास अमोल भगत प्रस्तुत ‘याला जीवन ऐसे नाव’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलघडणार आहे. त्यात ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर, पुष्कर श्रोत्री, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, सावनी रवींद्र व प्रसन्नाजीत कोसंबी आदी कलाकार सहभागी होणार आहेत.

२९ जानेवारी या दिवशी ‘चला हवा येवू द्या – होऊ दे व्हायरल’ ची पूर्ण टीम हास्य मैफिल रंगविणार आहेत. डॉ. निलेश साबळे, भारत गणेशपुरे, भालचंद्र कदम उर्फ भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, विनीत भोंडे अशा सगळ्या धमाल कलाकाराची धमाल प्रत्यक्ष पाहता व अनुभवता येणार आहे.

३० जानेवारी या दिवशी ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘स्वरत्रिवेणी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, आनंद माडगुळकर, अतुल परचुरेआदी कलाकार सहभागी होणार आहेत. ३१ जानेवारी या दिवशी गायक महेश काळे यांच्या ‘स्वरतरंग ’ या सुरेल मैफिलाचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. याच मैफिलीने महोत्सवाची सांगता देखील होणार आहे.

यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, महोत्सवाचे ९वे वर्ष असून या महोत्सवात हृदयनाथ मंगेशकर, हरिहरन, कीर्ती शिलेदार, सुरेश वाडकर, जयमाला इनामदार आदी मान्यवर या महोत्सवात सहभागी झाले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, उषा मंगेशकर, महेश मांजरेकर यांना यापूर्वी महोत्सवाच्या निमित्ताने गौरविण्यात आले आहे.

कालावधी – २८ ते ३१ जानेवारी

स्थळ – आयडियल कॉलनी मैदान, कोथरूड

वेळ – सायंकाळी ६.३० वाजता