१५० रुपयाची लाच स्विकारताना कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन- जमीनीचा उतारा देण्यासाठी १५० रुपयाची लाच स्विकारताना तहसिल कार्यालयातील कोतवालाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडे.  ही कारवाई आज उत्तर सोलापूर तहसिल कार्य़ालयात करण्यात आली.
बाळासो यमाजी हजारे (वय-४५) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या कोतवालाचे नाव आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांनी ६ ड च्या उताऱ्याची मागणी केली होती. उतारा देण्यासाठी हजारे याने तक्रारदार यांच्याकडे ५०० रुपयाची लाच मागितली. तडजोडीमध्ये १५० रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता हजारे याने १५० रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले. अधिकाऱ्यांनी आज उत्तर सोलापूर तहसिल कार्यालयात हजारे याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, सहायक फौजदार सोलनकर, पोलीस हवालदार पवार, बिराजदार, पोलीस शिपाई देशमुख सिद्धराम यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.