COVID-19 समर्पीत वायसीएम रुग्णालयाचा मृत्यूदर राज्यात सर्वात कमी

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरामध्ये रुग्णांची संख्या वाढत असली तरी शहराचा मृत्यूदर कमी आहे. महानगरपालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित रुग्णालय आहे. कोरोना विषाणूवर कोणतेही औषध नसताना डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. वायसीएममध्ये आतापर्यंत एकूण 60 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयात मृत्यू होण्याचे प्रमाण 1.86 टक्के असून राज्यातील कोविड समर्पित रुग्णालयापैकी वायसीएमचा मृत्यू दर सर्वात कमी आहे.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कोविड समर्पित रुग्णालयाचा आढावा घेतला. यामध्ये सर्व रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्या, उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या, उपचारादरम्यान मृत्यू होण्याचे प्रमाण, प्रशासनकाडून करण्यात येणारी उपाययोजना यांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. यामध्ये पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयाचा मृत्यू दर राज्यातील इतर कोविड समर्पित रुग्णालयांपेक्षा सर्वात कमी असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील इतर कोविड समर्पित रुग्णालयांना वायसीएम रुग्णालयाप्रमाणे मृत्यू दर कमी करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी समयसुचकता दाखवत वायसीएम हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आयसोलेशन वॉर्ड तयार केले. शहरात एकही कोरोनाचा रुग्ण नसताना महामारीला सामोरे जाण्यासाठी मनपाने आगोदरच सर्व तयारी केली होती. 10 मार्च रोजी शहरात पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला. तबलीगी मरकझ प्रकरणानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्यावर नियंत्रण मिळाले होते. मात्र, अनलॉक 1 मध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आणि वाढत आहे.

कोरोनावर उपचार करण्यासाठी कोणतेही ठोस औषध, लस उपलब्ध नसतानाही, वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवून कोरोना बाधित रुग्णांना बरे केले. कोरोना रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आणि मृत्यूदर कमी ठेवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले आहे. 12 एप्रिल रोजी वायसीएम रुग्णालयात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला. त्यानंतर पिंपरी चिंचवडमधील आणि हद्दीबाहेरील एकूण 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मनपा अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोरोना बाधित रुग्णाला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. ज्यांना फ्ल्यू सारखी लक्षण आढळून येत असतील त्यांनी त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.