कोयनेतून पाण्याचा विसर्ग झाला कमी ; सांगली, कराडला काहीसा ‘दिलासा’, अलमट्टीतून ४ लाख क्युसेक ‘विसर्ग’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कोयना परिसरात पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असून त्यामुळे सांगली, कराडमधील पाणी उतरण्यास मदत होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून सांगली, कराड शहराला पाण्याचा वेढा पडला असून संपूर्ण शहर महापुराच्या पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
कोयना धरणातून कालपर्यंत १ लाख २० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. तो गुरुवारी सकाळी ८३ हजार क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे बंगलुरु महामार्गावर वठार येथे आलेले पाणी कमी होण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर येथे आज सकाळीपर्यंत २६७ मिमी पाऊस झाला आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी रांगा

सांगलीत आलेल्या महापूराने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. संपूर्ण सांगली शहर पाण्याखाली गेले असले तरी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे अवघड झाले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पालिकेने काही ठिकाणी सोय केली असून तेथे पाणी घेण्यासाठी लांबवर रांगा लागल्या आहेत. प्रत्येकाला १० लिटर पाणी देण्यात येत आहे. शहरातील अनेक भागातील दुकानांमध्ये पाणी शिरुन संपूर्ण माल भिजून गेला आहे. त्यामुळे पाण्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असून दुध, भाजीपाला व अन्य साहित्यांचा मिळणे मुश्किल झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील १३० गावांचा संपर्क तुटला असून अनेक गावांमध्ये अजून प्रशासन मदतीसाठी पोहचू शकलेले नाहीत.

अलमट्टी धरणातून ४ लाख क्युसेकचा विसर्ग

कर्नाटकाच्या अलमट्टी धरणातून बुधवारी दुपारपासून ४ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. एका बाजूला कोयनेतून विसर्ग कमी झाला असताना अलमट्टीतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु झाल्याने सांगलीमध्ये कृष्णा नदीला आलेला फुगवटा कमी होण्यास मदत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीला भेट देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पश्चिम महाराष्ट्रातील महापूराचा आढावा घेतले असून आज ते सांगलीला भेट देणार आहेत. सांगली विमानतळावर उतरल्यानंतर ते महापूर आलेल्या काही ठिकाणी भेट देऊन प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेणार आहेत. साताऱ्यातील सहा गावांचा संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

आरोग्यविषयक वृत्त