Pune : पुण्यात व्यापार्‍यांचे आंदोलन, म्हणाले – ‘कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ब्रेक दि चेनच्या अंतर्गत 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र या निर्बंधांना व्यापारी तसेच छोट्या उद्योजकांनी विरोध केला आहे. कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊन से मरेंगे हम अशी माहिती फलके हातात घेऊन राज्‍य सरकार आणि पुणे महापालिकेच्या निर्णया विरोधात पुणे व्यापारी महासंघाने गुरुवारी (दि. 8) लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले. यावेळी महासंघाने काळ्या फिती लावून दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा निषेध केला.

जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज ते नाना पेठेतील क्वॉर्टर गेटपर्यंत 6 फुटांचे अंतर ठेवत साखळी केली होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या आंदोलनात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह व्यावसायिक सहभागी झाले होते. यावेळी, व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा निषेध, मेरा पेट मेरी मजबुरी, दुकान खोलना है जरूरी आदी माहितीपर फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.

राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या मिनी लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे व्यापारी महासंघातर्फे दोन दिवसीय तीव्र आंदोलन छडले आहे. शहरातील किरकोळ व घाऊक अशी जवळपास 40 हजार दुकाने बंद आहेत. बंदमुळे पुरवठा साखळी खंडीत झाली असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापा-यांनी केली आहे.