Kolhapur News : उत्तूरजवळील अपघातात कुडाळचा युवक ठार !

आजरा : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर येथील उत्तूर रस्त्यावर गावाजवळच्या धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. रोहीत रमाकांत कुडाळकर ( वय २२, कुंभारवाडी -कुडाळ जि. सिंधुदुर्ग ) हा युवक जागीच ठार झाला. तर सिध्देश सुर्यकांत पेडणेकर हा गंभीर जखमी आहे.

रोहीत कुडाळकर यांच्यासह पाचजण हुंडाई क्रेटा गाडी घेऊन फिरण्यासाठी महाबळेश्वर, लोणावळा येथे गेले होते. फिरून झाल्यावर परत ते कुडाळ येथे जात होते. त्यावेळी उत्तूरजवळील वळणावर रात्री २.३० वा. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याकडेला असणाऱ्या दगडाला धडकली. गाडी पलटून शंभर मीटर अंतरावर घसरत गेली. रोहीत हा गाडीच्या सनराईजमधून रस्त्यावर फेकला गेला. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने तो जागीच ठार झाला, तर जगन्नाथ पेडणेकर यांच्या पोटाला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गाडीतील ओंकार मेघनाथ वालावलकर( नेरुर), बाबूराव सुभाष परब( नाबरवाडी), रघुनाथ बाबू कुंभार( कुंभारवाडी) हे तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. शवविच्छेदन करुन रोहीत कुडाळकर याचा मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रोहीत हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहे. वडिल आजारी असल्याने ते घरीच आहेत तर आई घरकाम करते. रोहीत हा कुडाळमध्ये वायफाय कनेक्शनचे काम करतो. अधिक तपास सहायक फौजदार कोचरगी करीत आहेत.