जेजुरी : फिनलँडच्या वऱ्हाडींकडून जेजुरीत कुलधर्म कुलाचार

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून जेजुरीचा खंडेराया बहुजन बांधवांमध्ये प्रचलित असला तरी आजच्या विज्ञान युगात भारतीय संस्कृतीमधील जागत्या गाजत्या लोकदेवाची महती अवघ्या विश्वात नांदत असल्याचे जाणवते.

महाराष्ट्रीयन वर व फिनलँडच्या वधूचे मराठी संस्कृतीनुसार लग्न पार पडले. त्यानंतर कुलधर्म कुलाचार करण्यासाठी वऱ्हाडी मंडळी जेजुरीला आली. येथे विदेशी पाहुण्यांनीही कुलधर्म कुलाचार करत सर्व विधीमध्ये उत्सुकतेने भाग घेतला. जागरण गोंधळ, तळी भंडार आदी विधी करीत श्रद्धेने गडावर भंडारा उधळत जयघोष केला.

कल्याण – सुभेदार वाडा (जि. ठाणे) येथील निवृत्त प्राचार्या समिधा इनामदार या मूळच्या औंध (जि. सातारा) संस्थानमधील एका खेडेगावातील. उद्योग व्यवसायानिमित्त त्या ठाणे येथे स्थायिक झाल्या. त्यांचा मुलगा डॉ. ओंकार इनामदार हे फिनलँडमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. तेथे कार्यरत असलेल्या येन्ना हलकोला यांच्याबरोबर त्यांचा विवाह ठरला.

ठाणे येथे मराठी संस्कृतीप्रमाणे विवाह पार पडला. इनामदार घराण्याचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया आहे. त्यामुळे वधूकडील आई, वडील, बहिणी, मेव्हणे, भाऊ, भावजयी व मित्र मैत्रिणींसह २३ जण जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी आले.

रिवाजाप्रमाणे वधूला पाच पायऱ्या उचलून घेतले. सर्वांनी मंदिरात देवदर्शन घेतले. त्यानंतर शहरातील पुरोहित खाडे यांच्या निवासस्थानी जागरण गोंधळ, तळीभंडार केला. लंगर तोडला.

या सर्व विधींमध्ये परदेशी पाहुणे मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. यावेळी देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे यांनी भाविकांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. दरवर्षी आम्ही येथे येऊन धार्मिक विधी करणार असल्याचे परदेशी पाहुण्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/