लष्करामध्येही आता Corona चा शिरकाव, काश्मीरमध्ये CRPF च्या 31 जवानांना ‘कोरोना’ची लागण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत भारत चौथ्या क्रमांकावरती पोहचला आहे. देशात वाढत असलेल्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे मोठ्या प्रमणावरती काम करत आहे. तरीसुद्धा रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीमधील कुलगाममध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३१ जवानांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कुलगाममध्ये तैनात सीआरपीएफच्या ९० बटालियनमध्ये ३०० हुन अधिक सैनिकांची कोरोना संसर्ग चाचणी करण्यात आली होती. यामध्ये ३१ जवानांना कोरोना संसर्गाची लागणं झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

केंद्रीय राखीव दलाच्या संपूर्ण तुकडीची कोरोना संसर्ग चाचणी करण्यात आली. कुलगाममध्ये तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे सध्याच्या परिस्थतीला या भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी सुरु आहेत. सीआरपीएफच्या ९० बटालियनचे जवान अशा चकमकीत सक्रिय भाग घेतात. मात्र, कोरोना संसर्गाचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर १८ व्या बटालियनचे जवान दहशतवाद्यांविरुद्धच्या संयुक्त कारवाईत सहभागी झाले आहेत. शनिवारी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा आणि कुलगाम येथे सुरक्षा दलं आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाल्या. त्यावेळी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

देशात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ३ लाख ८ हजार ९९३ इतकी झाली आहे. तर ८,८८४ जणांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. आतापर्यंत १ लाख ५४ हजार ३२९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १ लाख ४५ हजार रुग्णांवरती अद्याप उपचार सुरु आहे. गेल्या २४ तासांत ११ हजार ४५८ कोरोना संसर्गित नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३८६ जणांचा मृत्यू झाला आहे.