कुख्यात दहशतवादी झीनतचा साथीदारासह खात्मा  

श्रीनगर : वृत्तसंस्था  – जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत कुख्यात दहशतवादी झीनत उल इस्लाम याच्यासह त्याचा एक साथीदार ठार झाला. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एके-४७ रायफल आणि इतर साहित्‍य जप्त करण्यात आले आहे. झीनत हा वॉन्टेड दहशतवादी होता. तो अल बद्र या दहशतवादी गटाचा असून, तो इम्प्रुवाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइस (आयईडी) हाताळण्यात तज्ञ होता.
शनिवारी दुपारी कुलगाममध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी एका घराआडून जवानांवर गोळीबार केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात दोन दहशतवादी ठार झाले.
झीनत हा काश्मीर खोऱ्यातील कुख्यात दहशतवादी होता. सुरक्षा दलांच्या हिट लिस्टवर तो होता. तर दुसऱ्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाही. झीनतला IED चे विशेष ज्ञान होते आणि यापूर्वी तो हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत होता, असं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.
दरम्‍यान, काही स्‍थानिक नागरिकांनी दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत करण्याचेही प्रयत्न केले. यावेळी अश्रूधूराचा मारा करण्यात आला. तसेच या भागातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
पुण्यातील मेजरसह २ जवान शहीद –
शुक्रवारी सायंकाळी नियंत्रण रेषेजवळ  (एलओसी) गस्त घालणाऱ्या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यासाठी दहशतवाद्यांनी राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये केलेल्या आयईडीचा स्फोटात पुण्यातील एका मेजरसह दोन जवान शहीद झाले. मेजर शशी नायर हे पुण्यातील खडकवासला येथे राहत होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us