भाजपच्या तिकिटावर कुमार विश्वास सोनिया गांधींच्या विरोधात उभे राहणार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले असताना उलट सुलट चर्चेला आता उधाण येऊ लागले आहे. अमेठी मतदार संघातून राहुल गांधी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले आप  नेते कुमार  विश्वास हे आता सोनिया गांधी यांच्या विरोधात रायबरेली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत असे वृत्त सूत्रांकडून मिळाले आहे.

कुमार विश्वास आणि अरविंद केजरीवार यांच्यात सध्या चांगलेच शीतयुद्ध सुरु आहे. कुमार विश्वास यांच्या लोकप्रियतेचा अरविंद केजरीवाल धसका घेतात आणि त्यांना राजकारणात रोखण्याचा प्रयत्न करतात असा बोलबाला दिल्लीच्या राजकारणात आहे. मागे अापचे राज्यसभेचे सदस्य निवडताना कुमार विश्वास यांना जाणीवपूर्वक दूर लोटण्यात आले तसेच पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून हि केजरीवाल यांनी कुमार विश्वास यांना दूर ठेवले. या सर्व कूटनीतीला कंटाळून कुमार विश्वास यांनी भाजपमध्ये जाण्याच्या  निर्णयाचा विचार केला असावा असे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.

रायबरेली लोकसभा मतदारसंघासाठी आम आदमी पक्षाचे नेते डॉ. कुमार विश्वास आणि आमदार दिनेश प्रताप सिंह, यांची नावे आघाडीवर आहेत. आमदार दिनेश प्रताप सिंह हे उत्तर प्रदेशातील ग्रामीण भागातील लोकप्रिय नेते असून त्यांच्या ओघवत्या वक्तृत्व्यासाठी ते ओळखले जातात तर रायबरेली मतदार संघात ब्राह्मण मतदार अधिक असल्याने त्यांना प्रलोभित करण्यासाठी कुमार विश्वास यांना ब्राह्मण कार्ड म्हणून वापरले जाऊ शकते.

तर कुमार विश्वास यांच्या रूपाने भाजपला चांगला चेहरा मिळू शकतो. त्या चेहऱ्याच्या जोरावर उत्तर प्रदेशातील १५ टक्के ब्राह्मण समाजाला आपल्या बाजूने करण्यात भाजपला यश येईल असे बोलले जाते आहे. तर दिल्लीच्या विधानसभा राजकारणात कुमार विश्वास यांना उतरवून अरविंद केजरीवाल यांना चांगलाच झटका देण्याचा कार्यक्रम भाजप आखू पाहत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणाला कंटाळलेले कुमार विश्वास आम आदमी पार्टी सोडण्याचा मोठा निर्णय घेतील का हे येत्या काळात पाहण्या सारखे राहणार आहे.