Kumbh Mela Haridwar 2021 : कुंभमेळा 2021 साठी तयार हरिद्वार, जाणून घ्या केव्हा होणार 4 शाही स्नान

हरिद्वार : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना महामारी दरम्यान कुंभमेळा 2021 चे आयोजन हरिद्वारमध्ये होत आहे. याची तयारी सुद्धा अतिशय असाधारण आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊननंतर कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. कुंभमेळ्याच्या तयारीवर याचा मोठा परिणाम झाला होता. यानंतर अखिल भारतीय अखाडा परिषद आणि संत समाजाच्या संकल्पानंतर तयारीने जोर पकडा. उत्तराखंडमध्ये शासन आणि स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे. याचाच परिणाम आहे की, कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी हरिद्वार आता तयार आहे. 12 वर्षानंतर होणारा कुंभमेळा यावेळी 11 वर्षांनी होत आहे. कोरोना काळात इतके मोठे आयोजन सरकार आणि प्रशासनासाठी एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही.

केव्हा होणार चार मोठे शाही स्नान

हरिद्वार कुंभमेळ्यात चार शाही स्नान होतील. हे सत्र महाशिवरात्री 11 मार्च 2021 पासून सुरू होऊन चैत्र अमावस्या म्हणजे 12 एप्रिल, सोमवती अमावस्यापर्यंत चालेल. तिसरे शाही स्नान 14 एप्रिलला मेष संक्रांतीला होईल आणि चौथे शाही स्नान वैशाखीला 27 एप्रिलला होईल. याशिवाय पर्व स्नान सुद्धा होतील. माघी पोर्णिमा 27 फेब्रुवारीपासून पूर्व कुंभची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.

वधूप्रमाणे सजली आध्यात्मिक नगरी

कुंभ नगरीला श्रद्धा आणि संस्कृतीच्या रंगात रंगवले जात आहे. भिंतींवर सुंदर चित्र आणि स्लोगन दिसू लागले आहेत. पुल, गंगाघाट, पाण्याच्या टाक्या, घरे सर्व आकर्षक पेंटने सजवण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी पिवळा आणि भगवा रंग पसरलेला दिसत आहे. धर्म-श्रद्धेसह उत्तराखंडची लोक परंपरा आणि संस्कृतीच्या रंगाची छटा सुद्धा हरिद्वारमध्ये ठिकठिकाणी दिसत आहे. केदारनाथ धाम, बद्रीनाथ धाम, गंगोत्री धाम आणि यमुनोत्री धाम सारखे बोर्ड सुद्धा येथे दिसू लागले आहेत.

कशी सुरू आहे तयारी

हरिद्वार प्रशासन सुविधांचे व्यवस्थापन कर÷ण्यात गुंतले आहे. रस्ते रूंद करण्यासह घाटांचा विस्तार केला जात आहे. रेलिंगची मजबूत व्यवस्था सुद्धा केली जात आहे. पार्कींगसाठी मोठी जागा, पब्लिक टॉयलेट्सची निर्मीती केली जात आहे. बहुतांश कामे या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होतील, असे प्रशासनाने म्हटले आहे.

कुंभ मेळ्याचे अधिकारी दीपक रावत यांच्यानुसार. कुंभमेळ्याच्या स्थायी बांधकामाचा खर्च जवळपास 321 कोटी रुपये आहे. यामध्ये 7 पुल, कावड मार्गाची बायंडिंग, चिल्ला रोडची बायंडिंग, सिडकुल धनौरी मार्ग नव्याने बनवणे, हरिद्वारच्या सर्व रस्त्यांची दुरूस्ती, पाणी पुरवठा, वीजेचे दोन अधुनिक सब स्टेशन आणि घाटांची निर्मिती यांचा समावेश आहे.

रावत यांनी सांगितले की, कांगडा घाटाची क्षमता वाढवण्यात आली आहे. हर की पौडी येथे सीएसआर प्रोजेक्टमधून नवीन दरवाजे बनवले जात आहेत. चप्पल स्टॉल शिफ्ट करण्यात आले आहे. बेलवालामध्ये आधुनिक टॉयलेट्स तयार आहेत. संपूर्ण शहरात कुंभ थीम किंवा हिंदू मायथोलॉजीच्या थीम्सवर आकर्षक पेंटिंग तयार केल्या जात आहेत. सर्व कामे जवळपास पूर्णतेकडे पोहचली आहेत.

कोरोनापासून बचाव

रावत यांनी सांगितले की, कोविड काळ सुरू असल्याने सोशल डिस्टन्सिंग अंतर्गत स्नानाच्या दरम्यान भाविकांमध्ये अंतर राहावे यासाठी योजना बनवली जात आहे. सोबत 1000 बेडचे कोविड हॉस्पीटल सुद्धा बनवले जात आहे. 20-20 बेडची सेक्टर हॉस्पिटल बनवली जात आहेत. इतर आधुनिक मशीनरी सुद्धा खरेदी केली जात आहे.

पोलिसांसोबत अर्धसैनिक दल आणि कमांडो

कुंभमेळा 2021 आयजी संजय गुंजाळ यांनी म्हटले आहे की, इतक्या मोठ्या आयोजना दरम्यान सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. मेळा क्षेत्रात 24 सेक्टर बनवली जात आहेत. पोलीस दलासह पॅरा मिलिट्री फोर्स, एनएसजी कमांडो इत्यादी सुद्धा तैनात करण्यात येत आहेत. संपूर्ण मेळा क्षेत्र सीसीटीव्हीच्या देखरेखीत असेल. सोबतच भाविकांना कोविड-19 प्रोटोकॉलच्या सर्व नियमांचे पालन करत कुंभस्नानासाठी जाण्याचे आवाहन केले जाणार आहे.