कुंभ स्नानासाठी हरिद्वारला जाताय ? तर ही महत्त्वाची बातमी वाचाच !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुंभ मेळा 2021 ची तयारी मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. यंदाचा कुंभ मेळा हरिद्वार येथे होत आहे. तीर्थनगर हरिद्वार येथे 11 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारीला दोन मोठ्या स्नानाची तयारी सुरु आहे. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.

सध्या जगभरातील कोरोनाचे वाढते संकट आणि सुरु होत असलेला कुंभ मेळा. यामुळे भाविकांना काही नियम अटींचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे तिथं जाण्यापूर्वी काही नियम अटींची माहिती घ्यावी.

72 तासांपूर्वीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट बंधनकारक
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून काही गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, भाविकांना 72 तासांपूर्वीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे दाखविणे बंधनकारक आहे. तसेच कुंभ मेळादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. चेहऱ्यावर मास्क, सॅनिटायझरसह प्रवेश दिला जाणार आहे.

रजिस्ट्रेशन करावे लागणार
हरिद्वारचे जिल्हाधिकारी सी. रविशंकर यांनी सांगितले, की कुंभमेळ्यात येण्यास इच्छुक असणाऱ्या भाविकांनी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांना कोरोना रिपोर्ट, मेडिकल सर्टिफिकेट आणि ओळखपत्र यांसारखी कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. त्यानंतर कुंभ मेळा प्रशासनाकडून पास दिला जाईल. haridwarkumbhmela2021.com या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल.