जातीचा बनावट दाखला काढणाऱ्या जुन्नरमधील सरपंचास अटक

जुन्नर (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन – खोटे दस्तऐवज वापरून जातीचा बनावट दाखला काढून सरकारी कामासाठी त्याचा वापर करण्यात आल्याची घटना कुमशेत (ता.जुन्नर) येथे घडली आहे. या प्रकरणी कुमशेत येथील सरपंच सीताबाई लक्ष्मण दुधवडे यांना जुन्नर पोलिसांनी बुधवारी (ता. २०) रोजी अटक केली. यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद साबळे यांनी सांगितले की, जुन्नर न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यापुढील कारवाई नंतर केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

सीताबाई लक्ष्मण दुधवडे यांच्या विरोधात पाडळी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रत्नमाला दुराफे यांनी या प्रकरणी जुन्नर पोलीसांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने या प्रकारची शहानिशा केली आणि सीताबाई दोषी असल्याचे समजताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी सीताबाई दुधवडे यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जाऊन शाळा सोडल्याचा दुबार दाखला काढला. संबंधित महिलेने फसवणुकीच्या उद्देशाने आपल्या माहेरचे नाव सांगून पाडळी येथील शाळेतून बनावट दाखला काढला. एवढेच नव्हे तर आरोपी महिलेने चक्क शाळेच्या नावाने खोटे शिक्के तयार करून आपल्या वडिलांचा खोटा दाखला तयार केला. आणि या दाखल्यावरूनच त्यांनी जातीचा बनावट दाखला काढला आणि सरकारी कामासाठी त्याचा गैरवापर करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे महिला आरोपी एक सरपंच आहे.

सीताबाई दुधवडे यांनी आपल्या माहेरचे नाव चंद्रभागा बाळू केदारी असे सांगून पाडळी शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक पोपट सांगडे यांच्याकडून शाळा सोडण्याचा दुबार दाखला त्यांनी मिळविला. विशेष म्हणजे शालेय दप्तरात वडील बाळू केदारी यांची नोंदच नव्हती, तरीही तक्तालीन मुख्याध्यापक वामन साबळे यांच्या नावाने खोटी सही करून अतिशय हुशारीने शाळेच्या नावाचे खोटे शिक्के तयार केले. त्या शिक्क्यांचा वापर करून शाळा सोडण्याचा बनावट दाखला तयार केला. आणि त्याच दाखल्यावरून जातीचा बनावट दाखला काढला आणि सरकारी कामासाठी त्याचा वापर करण्यात आला असे पोलिसांनी सांगितले आहे.

Visit : Policenama.com