कोर्टाचा अवमान प्रकरण : ‘कॉमेडीयन’ कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार ! प्रतिज्ञापत्रात म्हणाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) यानं सुप्रीम कोर्ट आणि अनेक वकिलांवर टिप्पणी केल्या प्रकरणी माफी मागण्यास नकार दिला आहे. या खटल्याच्या सुनावणीपूर्वी कोर्टाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यानं सांगितलं की, ताकदवान लोक, संस्था यांना जर फटकारणं किवा टीका केलेलं सहन होणं हे जर कायम राहिलं तर आपला देश बांधील कलाकार आणि पाळीव कुत्र्यांचा होऊन जाईल. यावेळी त्यानं काश्मीरचा उल्लेख करत कोर्टावर टीका केली.

कुणालला गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी सोशल मीडिया पोस्टमधून कथितपणे खिल्ली उडवणं आणि अवमान केल्या प्रकरणी नोटीस पाठवली होती. अटॉर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी त्याच्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली होती.

नोटीशीला दिलेल्या उत्तरात कुणाल म्हणाला, जजला देखील विनोदांपासून सुरक्षा मिळत नाही. न्यायपालिकेत लोकांचा भरोसा त्याच्या स्वत:च्या कामातून मिळतो कोणत्या टिप्पणी किंवा आलोचनेतून नाही. यावेळी त्यानं कॉमेडीयन मुनव्वर फारूकीच्या अटकेचाही उल्लेख केला. तो म्हणाला, आम्ही अभिव्यक्ती आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यावरील हल्ल्याचे साक्षीदार बनत आहोत. अशा विनोदांसाठी फारूकीला जेल झाली, जे त्यानं ऐकवलेही नाही. त्यानं सांगितलं की, शाळेतील मुलांचीही देशद्रोहाबद्दल चौकशी केली जात आहे.

कामरानं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, हे विनोद खरे नाहीत, आणि तसं असल्याचा दावाही करत नाही. जास्त करून लोक अशा विनोदांवर प्रतिक्रिया देत नाहीत, ज्यावर त्यांना हसू येत नाही. ते अशांकडे दुर्लक्ष करतात, जसे आपले नेते टीकाकारांकडे करतात. एका विनोदाचं आयुष्य तिथंच संपायला हवं.

शुक्रवारी जस्टीस अशोक भूषण, आर सुभाष रेड्डी आणि एमआर शाह यांनी या प्रकरणी सुनावणी दिली. याव्यतिरीक्त हे खंडपीठ आता व्यंगचित्रकार रचिता तनेजा (Rachita Taneja) हिच्या कारणे दाखवा नोटीसीवरही सुनावणी देणार आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजुर करण्यात आल्यानंतर कुणाल कामरानं यासंदर्भात ट्विट केलं होतं. यावर आक्षेप घेण्यात आला होता. रचिता तनेजानं काढलेल्या व्यंगचित्रातून न्यायालयाचा अवमान झाल्याचं सांगितलं जात होतं. या प्रकरणी अवमान खटला चालवण्याची मागणी करण्यात आली होती. अटर्नी जनरल के. वेणुगोपाल यांनी दोघांविरोधात खटला चालवण्यासाठी परवानगी दिली होती. यानंतर शुक्रवारी (दि 18 डिसेंबर 2020 रोजी) सुप्रीम कोर्टानं दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कुणाल आणि रचिता या दोघांनाही 6 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

असंय पूर्ण प्रकरण !
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना जामीन मंजुर करण्यात आल्यानंतर ट्विट करताना स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं न्या. चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्टाबाबत नाराजी व्यक्त केली. या संदर्भात कुणालनं काही ट्विट्सही केले. यानंतर पुण्यातल्या काही वकिलांनी ॲटर्नी जनरल यांच्याकडे तक्रार केली. यानंतर कुणाल विरोधात खटला दाखल करण्याचे आदेश ॲटर्नी जनरल यांनी दिले.