स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची इंडिगो एअरलाईन्सला ‘नोटीस’ ! 25 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – इंडिगो एअरलाईन्सने प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वर ६ महिन्यांसाठी बंदी घातली आहे. या बंदीबद्दल पायलटने आपल्याकडे कोणतीही चौकशी न करता ही कारवाई केल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता कुणाल कामराने इंडिगो एअरलाईन्सला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये आपल्यावरील बंदी उठवावी आणि मानसिक त्रास दिल्याबद्दल २५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कुणाल कामराने ट्विट करत त्याच्या समर्थकांचे आभार मानले आहेत. लॉमेन अँड व्हाइट यांनी ही लढाई विशेष केस म्हणून स्वीकारली आहे, अशी माहिती कुणाल याने दिली असून इंडिगो एअरलाइन्सने माफी मागावी आणि सर्व वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांना याची माहिती द्यावी, अशी मागणी कुणालने केली आहे.

दिल्लीहून लखनौला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये कुणाल कामराची पत्रकार अर्णब गोस्वामी याच्यासोबत भेट झाली होती. कुणालने या दरम्यान अर्णब गोस्वामी याच्याबरोबर वाद घातला. विविध विषयांबाबत कुणालने त्यांना प्रश्न विचारले. मात्र अर्णब गोस्वामी त्याच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर देत नव्हता. या सर्व प्रकाराचा कुणालने व्हिडिओ शुट करुन तो आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन शेअर केला होता. त्यानंतर इंडिगोकडून कुणाल कामरा याच्यावर सहा महिने बंदी घालण्यात आली आहे. त्यावर टिका टिप्पणी सुरु असून केंद्र सरकारच्या दबावामुळेच कुणालवर बंदीसारखी अतिशय कठोर शिक्षा बजावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कुणाल याने त्याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.