ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या उत्सवाची सांगता निकाली कुस्त्यांनी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) – पुणे-सोलापूर महामार्गावरील रोल माॅडेल होऊ घातलेल्या कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामदैवत काळभैरवनाथ देवाच्या वार्षिक उत्सवाची सांगता निकाली कुस्त्याच्या जंगी आखाड्याने झाली. यात उपमहाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे व हिंद केसरी राजु तोमर यांच्यात दोन लाख एक्कावन हजार व एक चांदीची गदा ही पहिल्या क्रमांकासाठीची कुस्ती झाली. हा जंगी आखाडा पंचक्रोशीतील सर्व कुस्ती शौकिनांना एक मोठी पर्वणीच ठरला.

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी हे शहरालगतचे मोठ्या लोकवस्तीचे गाव येथील ग्रामदैवत काळभैरवनाथाचा वार्षिक उत्सव दि.3 व 4 मार्च रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या उत्सवात ग्रामदैवत भैरवनाथाला महाअभिषेक करण्यात आला. तर रात्री दहा वाजता श्रीची पालखी (छबिना) काढण्यात आला. यावेळी अनेक ढोलताशा पथके लेझिम पथके यांनी आपली कला सादर केली.यावेळी त्यांनी योग्य बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला याचे सर्व नियोजन संदीप सुखराज धुमाळ व निलेश खटाटे यांनी केले.दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता कै तुकाराम खेडकरसह पांडूरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते.

या आखाड्यात महाराष्ट्रातील नामांकीत मल्लाची उपस्थिती मोठी होती.विशेष म्हणजे सर्व कुस्त्या निकाली होत्या.या आखाड्यात मल्लांना सुमारे पंधरा लाखांवर बक्षिसे देण्यात आली तसेच मानाच्या पाच कुस्तीमधील विजेत्यास चांदीची गदा देण्यात आली.यात महाराष्ट्र केसरी अभिजित कटके यांचा शिव छत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे चेअरमन संदीप धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे, तसेच माजी सरपंच संतोष कुंजीर, माजी उपसरपंच दत्तात्रय कुंजीर, दिलीप कुंजीर, राहुल धुमाळ, शिवाजी कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर, राष्ट्रवादी युवकचे संग्राम धुमाळ,सिध्दांत तुपे, महेंद्र कुंजीर, पोलिस पाटील मिलिंद कुंजीर, प्रकाश कुटे, आजित धुमाळ, पंडित झेंडे, निलेश धुमाळ, दिपक खटाटे, अमोल धुमाळ, विकास झेंडे, विशाल धुमाळ, आनंता कुंजीर व उत्सव कमिटी सदस्य उपस्थित होते. यात एकुण निकाली पंधरा कुस्त्या झाल्या यासाठी पंच म्हणून महेंद्र कुंजीर, निलेश खटाटे यांनी काम पाहिले. शेवटची कुस्ती ही दोन लाख एक्कावन हजाराची उपमहाराष्ट्र केसरी माऊली जमदाडे व हिंद केसरी राजु तोमर यांच्यामध्ये रंगली यात माऊली जमदाडे यांनी विजय मिळवला.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी सिकंदर शेख व इराण येथील आशिया सुवर्णपदक विजेता शेना घोलामीओरामी यांच्यात झाली यात सिकंदर शेखने नेत्रदीपक विजय मिळविला. कुंजीरवाडी आखाड्याला आसपासच्या गावातील कुस्ती शौकिनांनी तसेच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोणीकाळभोरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप कांबळे, पोलिस शिपाई नितिन सुद्रीक,गणेश कर्चे याच्यासह होमगार्ड यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.