सांगली : पोलीसनामा ऑनलाईनमा – मागील विस वर्षापासून नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू बुवाचा अनिसने भांडाफोड केला. कुपवाड पोलिसांनी या भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
गेल्या वीस वर्षांपासून हाफिजी महाराज या नावाने समस्या निवारणाचा दरबार हा शेख भरवित होता. लोकांना गंडे-दोरे, भंडारा देवून फसवणूक करीत होता. या बुवाबाबत अंनिसकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. मिरज येथील आम्रपाली शिंदे ही महिला नोकरीवर परत लागण्यासाठी या बुवाकडे गेली होती. यावेळी शेख यांनी शिंदे यांच्याकडे साडेसहा हजार रुपयांची मागणी केली. याबाबत शिंदे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी अंनिसकडे संपर्क साधला.
अंनिसचे डॉ. प्रदीप पाटील, अॅड. चंद्रकांत शिंदे, ज्योती आदाटे, प्रियांका तुपलोंढे, सुनील कोळेकर, कुमार कोळेकर यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे, राजू अन्नछत्रे, जाधव, नाईक, गायकवाड, मदने यांच्या मदतीने या भोंदू बुवाला पकडण्यासाठी सापळा रचला. प्रत्यक्षात दरबारात पैसे घेताना, भंडारा व जादूचे साहित्य देताना त्यास पोलिसांनी पकडले. पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा व नरबळी प्रतिबंध कायद्यातंर्गत कलम 2,5 नुसार शेख याच्यावर गुन्हा दाखल केला.
सांगलीत ट्रक चालकाला लुटले, पाचजणांना अटक
सांगली : शहरातील गोकुळनगर येथे ट्रकमध्ये झोपलेल्या ट्रकचालकासह त्याच्या मित्राकडील रोकड, मोबाईल लुटल्याप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. ही घटना १२ ऑक्टोबर रोजी घडली होती. करण किशोर शिंदे, योगेश ऊर्फ सोन्या रविंद्र पाटील, अस्लम अब्दुल रज्जाक शेख, सुशांत सुनील चंदनशिवे (सर्व रा. संजय गांधी झोपडपट्टी), धर्मा ऊर्फ आप्पा सर्जेराव मुलुंगे (रा. नवीन वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. १२ ऑक्टोबर रोजी गोकुळनगर येथे आण्णासाहेब श्रीरंग बंडगर व त्यांचा मित्र चंद्रकांत धुमाळ त्यांचा ट्रक पार्किंग करून त्यामध्ये झोपले होते. त्यावेळी सर्व संशयितांनी त्यांच्याकडील २ हजार सातशे रूपये, एक मोबाईल चोरून नेला होता. याच संशयितांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्यांना शुक्रवारी (दि.१९) अटक केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, उपनिरीक्षक सुनील भिसे, वसंत किर्वे, निवास माने, विनायक ऐवळे, दीपक परीट यांनी ही कारवाई केली.