कुर्बानीचा बकरा चोरणारा पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्यासाठी पाळलेला सानियन जातीचा बकरा चोरणाऱ्या चोरट्यास समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. ताफिम बेग (रा. मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून २५ हजार रुपये किंमतीचा बकरा ताब्यात घेण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली.
याप्रकरणी नाना पेठेत राहणारे यासर काझी यांनी फिर्याद दिली आहे.

समर्थ पोलीस ठाण्यातील तपासी पथक हद्दीमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गस्त घालत असताना आरोपी ताफिम हा बकरा घेऊन घाई गडबडीत जाताना दिसला. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याला थांबवून त्याच्याकडे असलेल्या बकऱ्याबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याला पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता त्याने बकरा नाना पेठेतून चोरल्याची कबुली दिली.

ही कारवाई ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, सहायक उपनिरीक्षक शेट्टिबा शिंदे, पोलिस शिपाई हेमंत पेरणे, सुभाष मोरे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त