कुरकुंभ आग आटोक्यात, ग्रामस्थ Vs कंपनी प्रशासन वाद, आ.कुल यांच्या मध्यस्थीने अनर्थ टळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी येथे बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अल्कली अमाईन्स या केमिकल कंपनीच्या स्टोरेज गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीचे रौद्ररूप पाहून अनेक अफवा पसरू लागल्या आणि काही वेळातच कुरकुंभ एमआयडीसी जवळ असणाऱ्या छोट्या गावांतील नागरिकांनी घर सोडून आपल्या मुला बाळांसह सुरक्षित ठिकाणी जाऊन आश्रय घेण्यास सुरुवात केली. अफवांचे पेव वाढत गेल्याने एमआयडीसीच्या १० किलोमीटरचा परीसर नागरिकांनी रिकामा करण्यास सुरुवात केली. हि परिस्थिती पाहून दौंडचे आमदार राहुल कुल यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणा कामाला लावून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले तर भीतीने स्थलांतर करणाऱ्या नागरिकांना त्यांनी फोन करून अफवांवर विश्वास न ठेवता आग आटोक्यात येत असून परिसराला धोका नसल्याने कुठेही जाऊ नये असे आवाहन केले.

Kukumbh

यावेळी दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी आणि दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनीही परिस्थिती आटोक्यात असल्याचे आवाहन करत होते. मात्र ही आग आटोक्यामध्ये येताच नागरिकांचा एमआयडीसीमध्ये असलेल्या केमिकल कंपन्यांबाबत असलेल्या रागाचा उद्रेक पुन्हा झाला आणि ग्रामस्थांनी आग लागलेल्या कंपनीचे थेट प्रवेशद्वार गाठत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी, पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि त्यांना जाब विचारणारे ग्रामस्थ असा एकच गोंधळ उडून परिस्थिती बिकट बनली होती.

वास्तविक पाहता ग्रामस्थांच्या उद्रेकाचे कारणही तसे विचार करायला लावणारेच असून दौंडच्या जनतेचा सुरुवातीपासूनच या केमिकल एम.आय.डी.सी आणि त्यातील केमिकल कंपन्यांना मोठा विरोध होता. कारण आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये ऑटोमोबाईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या एमआयडीसी वसत असताना दौंडच्या वाट्याला मात्र केमिकल एमआयडीसी देण्यात आली होती. यालाच दौंडकरांचा विरोध होता परंतु हा विरोध मोडीत काढून त्यावेळी स्थानिक नेते आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता मोठा राजकीय दबाव टाकून ही केमिकल एमआयडीसी दौंडकरांवर थोपवण्यात आली होती असा आरोप आजही दौंडकर करत आहेत. तेव्हापासून ते आजपर्यंत केमिकल एमआयडीसी बाबत दौंडच्या जनतेमध्ये कमालीची चीड निर्माण झालेली आहे.

Daund
आताही दर महिन्याला कोणत्या न कोणत्या कारणामुळे या केमिकल कंपन्यांमध्ये स्फोट होणे, आग लागणे आणि त्यामध्ये कामगारांचे मृत्यू होणे या घटना घडतच आहेत, त्यामुळे या परिसरामध्ये राहणारे नागरिक जीव मुठीत धरूनच जगत असतात. आजच्या घटनेने मात्र येथील नागरिकांच्या संयमाचा बांध फुटून त्यातून मोठा उद्रेक झाल्याचे पहायला मिळाले. विद्यमान आमदार राहुल कुल यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने ग्रामस्थ आणि कंपनी व पोलीस यंत्रणा यांच्यातील टोकाला गेलेला वाद शमविण्यात यश आले. यावेळी आमदार कुल यांनी कंपनीमध्ये ज्या ठिकाणी स्फोट होऊ आग लागली त्या ठिकाणी भेट दिली आणि संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेतली.

आ. राहुल कुल यांनी याबाबत बोलताना या घटनेमध्ये ज्यांचा हलगर्जीपणा असेल आणि ज्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आपण ग्रामस्थांच्या वतीने करत आहोत असे सांगितले. तर उप जिल्हाधिकारी हतगल यांनी बोलताना आमदार कुल यांनी या दुर्घटनेबाबत चौकशीची केलेली मागणी पूर्ण करू व येथील कंपनी मॅनेजमेंट व जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन यापुढे अशा दुर्घटना घडू नये यासाठी उपाय योजना करू असे शेवटी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –